बीड : प्रतिनिधी
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे होती. माजलगावचे आमदार प्रकाश सुंदरराव सोळंके हे अजित पवार गटात आहेत. मात्र अजित पवार यांच्या भाषणात सुरुवातीलाच उत्साही कार्यकर्त्यांनी अडथळा आणला. यावर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले.
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा राज्याच्या कानाकोप-यात जाऊन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारराजाचे आशीर्वाद मागत आहे. यानिमित्ताने लाडकी बहीण योजनेचे मेळावे आयोजित केले जात आहेत.
अजित पवार भाषणाला उभे राहताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ‘अजित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, एकच वादा अजित दादा’ अशा घोषणांनी सभेचा मंडप दणाणून गेला. दरम्यान प्रकाश सोळंके यांनी उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
शेवटी अजित पवार यांनी सूत्रे आपल्या हातात घेतली. डायसवरूनच उत्साही कार्यकर्त्यांना दम भरला. फालतूपणा बंद करा, आता जर तुम्ही घोषणा दिल्या तर मी भाषण बंद करून निघून जाईन, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना वॉर्निंग दिली.
काळ-वेळेचे भान असले पाहिजे
आम्हीही तरुण होतो. आम्हीही उत्साही होतो. आम्ही नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायचो. पण कार्यकर्त्यांना काळ-वेळेचे भान असले पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेऊन योग्य शब्दांत समज दिली.