23.3 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रभूखंड घोटाळा प्रकरणी वायकर यांना क्लिनचीट

भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर यांना क्लिनचीट

आर्थिक गुन्हे शाखेचा आश्चर्यकारक खुलासा
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत गेलेल्या रविंद्र वायकरांना आता मुंबई पोलिसांनी मोठा दिलासा दिला. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांना क्लीन चिट दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेले. पक्षांतर करा अन्यथा तुरुंगात जा, असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते, असे वायकरांनी म्हटले होते. यामुळे वायकरांची तुरुंगवारी टळणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात आझाद मैदान पोलिस ठाण्यात रविंद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनिषा, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता.

राज्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर वायकर उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यानंतर त्यांच्याविरोधातील कारवाईचा फास आवळला गेला. प्रकरण ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे असल्यानं तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. त्यामुळे वायकरांचा पाय खोलात गेला होता. तेव्हा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकरांनी पक्षांतर करीत शिंदे गटात गेले. त्यांना वायव्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ते निवडून आले. आता त्यांना कथित भूखंड घोटाळा प्रकरणातून क्लिनचीट मिळाली.

गैरसमजातून गुन्हा!
मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केला असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने प्रीसमरी रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. हा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वायकरांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेतले आहेत. महायुतीसोबत गेल्यानेच वायकरांना क्लिनचीट मिळाल्याची टीका होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR