मुंबई : प्रतिनिधी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. सर्व स्तरांतून आता प्रतिक्रिया येत आहेत. अशात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावरून मोदींना टोला लगावला आहे.
दरम्यान, जयंत पाटील म्हणाले, ‘विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स गेले काही दिवस खूप चांगला होता, मग अचानक काय झाले. १०० ग्रॅम वजन कसे वाढले? जर ती जिंकून आली तर तिला काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती, तिने जे आंदोलन केले होते ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल असे कोणाला वाटले का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत विनेश फोगाटच्या विजयानंतरही झालेल्या पराभवावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी है तो मुमकिन हैं असे म्हणतात, त्यांनी युक्रेन-रशिया युद्ध रोखले असे म्हणतात मग त्यांनी विनेशबाबत जे घडत आहे, ते रोखायला हवे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.