25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसंपादकीयमतदान यंत्राचे ‘महाभारत’!

मतदान यंत्राचे ‘महाभारत’!

लोकसभा निवडणुका होऊन दोन आठवडे उलटले, नवीन सरकारही स्थापन झाले परंतु मतदानासाठी वापरल्या जाणा-या मतदान यंत्रावरून (ईव्हीएम) सुरू असले ‘महाभारत’ थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा दावा अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी केला आणि या वादाला पुन्हा तोंड फुटले. ईव्हीएम हटविणे गरजेचे आहे, कारण मानव अथवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) ईव्हीएम हॅक होण्याचा धोका आहे असे मस्क म्हणाले.

त्याचीच री ओढत भारतातील ईव्हीएम म्हणजे ब्लॅक बॉक्स असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. त्याची तपासणी करण्याची कोणालाही परवानगी नाही असे सांगत राहुल गांधी यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली मात्र भारतात ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असा ठाम दावा भारतीय निवडणूक आयोगाने केला आहे. एलॉन मस्क यांचे मत खोडून काढताना माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांना आपल्याकडे शिकवणी लावावी असे आवाहन केले आहे. मस्क यांची टिप्पणी ही खूपच वरवरची आणि सामान्य आहे. सुरक्षित हार्डवेअर कोणीच तयार करू शकत नाही असे म्हणणे साफ चुकीचे आहे. मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित खरी ठरत असेल पण भारतात ईव्हीएममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. अमेरिका किंवा इतर काही देशांत इंटरनेट कनेक्टेड मतदान यंत्रे तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात. मात्र, भारतात हे शक्य नाही.

भारतीय ईव्हीएम सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्क किंवा माध्यमापासून वेगळे असल्याचा दावा राजीव चंद्रशेखर यांनी केला. काँग्रेससह देशातील अनेक विरोधी पक्ष ईव्हीएमवर शंका उपस्थित करीत आहेत. व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची शंभर टक्के पडताळणी करण्याची मागणी करत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी धुडकावून लावत ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपला ‘चारसौ पार’ जाता आले नाही. काँग्रेसने शंभरी गाठली, तरीही ईव्हीएमवरचे प्रश्नचिन्ह कायम आहे. राहुल गांधी आणि अनेक विरोधी पक्षनेते ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांपासून राज्य निवडणूक मंडळापर्यंत सर्वांनी ईव्हीएमविरोधातील आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते परंतु एकानेही ते आव्हान स्वीकारले नाही. लोकसभेचे एकंदर निकाल विरोधकांच्या बाजूने असतानाही मतदान यंत्राविरुद्ध तक्रारी सुरूच आहेत. केंद्रात सत्ता स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपरोधिकपणे म्हणाले होते, आतातरी किमान पाच वर्षे ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जाणार नाही! ईव्हीएममध्ये छेडछाड करून दाखवण्याचे आव्हान स्वीकारायचे नाही मात्र,

उगाच शंकाकुशंका व्यक्त करायच्या याला काय अर्थ? विरोधक केवळ आरोप-प्रत्यारोपात मग्न राहिले तर रोज तेच ते आरोप ऐकून सर्वसामान्य जनतेचा ईव्हीएमवरील आणि सार्वत्रिक निवडणुकीवरील विश्वासच उडेल. एलॉन मस्क यांच्या मतप्रदर्शनामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनचे भूत भारतीयांच्या मानगुटीवर बसू लागले आहे. आता मस्क मतदान यंत्राबाबत पुरेसा खुलासा करीत नाहीत आणि निवडणूक आयोगाकडून याबाबत सविस्तर प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत हा वाद थांबण्याची शक्यता दिसत नाही. आतापर्यंत निवडणूक निकालानंतर ईव्हीएमविषयी तक्रारी केल्या जात होत्या. या संदर्भात निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्टीकरणेही दिली आहेत. परंतु आता तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या तज्ज्ञाने या संदर्भात शंका उपस्थित केली आहे. ती दूर करताना निवडणूक आयोगाची कसोटी लागेल. म्हणजेच ईव्हीएमच्या शंकांविषयीचे आव्हान परतवून लावण्यासाठी निवडणूक आयोगालाच पुढाकार घ्यावा लागेल. केंद्र सरकारनेसुद्धा या संदर्भात मस्क यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वक्तव्याचा मतितार्थ समजून घेतला पाहिजे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवादी देशासाठी हा खुलासा महत्त्वाचा ठरेल.

एलॉन मस्क यांच्या वक्तव्यातून देशात चर्चा सुरू झाली असतानाच मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या निकालाच्यावेळी ईव्हीएम मशिन लॉक केली गेल्याचा आरोप झाला आहे. म्हणजे एकाच वेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या संदर्भातील वाद रंगू लागला आहे. या सगळ्या प्रकारात वस्तुस्थिती काय आहे हे स्पष्ट करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावरच आहे. ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे. ईव्हीएम मशिन लॉक होऊ शकत नाही. ईव्हीएम मशिनला कोणताही मोबाईल जोडता येत नाही, कोणताही ओटीपी दिला जाऊ शकत नाही. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावरील घटना ही उमेदवाराच्या सहाय्यकाने मोबाईल फोन अधिकृतपणे वापरल्याची घटना असून या संदर्भात यापूर्वीच फौजदारी गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे, असे स्पष्टीकरण या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिले आहे. निवडणुकीच्या मतदान कालावधीत काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम मशिन बंद पडण्याच्या घटना घडल्या अर्थात तात्काळ पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली.

त्यामुळे ईव्हीएम मशिन संदर्भात कोणत्याही तक्रारीला वाव नाही असा दावा निवडणूक आयोगाकडून केला जातो. एलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकते असे वक्तव्य केले नसते तर हा वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नव्हती अथवा इतर कोणीही अशी शंका व्यक्त केली असती तर ती कोणीही गांभीर्याने घेतली नसती. मात्र, एकूणच मस्क यांचे या क्षेत्रातील स्थान आणि योगदान लक्षात घेता त्यांनी केलेल्या शंकेचे निरसन करणे आवश्यक बनले आहे. मानवी चुका होऊ शकतात त्या टाळाव्यात म्हणून आणि अचूक कार्यपद्धतीसाठी ईव्हीएम मशिनचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. मस्क यांच्या विधानात थोडे जरी तथ्य आढळले तरी त्याचा परिणाम एकूणच देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर होईल. तसे झाले तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाबाबत शंका व्यक्त केली जाईल. तेव्हा मतदान यंत्राच्या शंकेबाबतचे चर्चेचे गु-हाळ संपविण्यासाठी त्वरेने शंकानिरसन करणे अत्यावश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR