मुंबई : प्रतिनिधी
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला म्हणून त्यांच्यावर आगपाखड करणा-या संजय राऊतांवर शरद पवार गटाने जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला हजेरी लावली. त्यावरून शरद पवार गटाने संजय राऊतांवर टीका केली आहे. शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी राऊत हे दुटप्पी भूमिका असणारे राजकारणी आहेत. तसेच राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्या नेत्यांनी उगाचच नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असा सल्लाही मातेले यांनी दिला.
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीतील एका कार्यक्रमात सत्कार केला होता. या सोहळ्यानंतर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि इतर नेतेमंडळींनी शरद पवारांवर टीका केली होती. आता शरद पवार गटाने संजय राऊतांवर टीका केली आहे. राऊतांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना दिल्लीत पुरस्कार देऊन गौरवले. त्यावेळी संजय राऊत यांनी त्यावर कडाडून टीका केली होती. आता त्याच संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुस्तक प्रदर्शनात हजेरी लावली, त्यावरून त्यांच्यावर टीका केली जातेय. त्यामुळे राजकीय निष्ठा आणि विचारधारा प्रश्नचिन्हांच्या भोव-यात सापडली आहे.