मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) एकही आमदार निवडून आला नसला तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मोठा फायदा केला आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या यूबीटीने जिंकलेल्या २० जागांमध्ये १० जागा अशा आहेत, ज्यात मनसेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे विजयाचे अंतर निश्चित केले आहे. त्यापैकी ८ जागा मुंबईतील होत्या आणि दोन राज्यातील इतर ठिकाणच्या आहेत.
या दहा जागांवर जर मनसेने निवडणूक लढविली नसती तर उद्धव ठाकरे यांच्या जागा घटून दहा राहिल्या असत्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पर्यायाने महायुतीला दहा अतिरिक्त जागा मिळाल्या असत्या. त्यामुळे निवडणुकीचे गणितच बदलले असते.
या जागा जेथे यूबीटीला मनसेमुळे फायदा झाला
मुंबईतील माहीम, वरळी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कालिना आणि वांद्रे पूर्व तर महाराष्ट्रातील वणी आणि गुहागर
तर शिंदे गटाचा फायदा झाला असता
मनसेच्या उमदेवारांनी शिंदे गटाला आठ जागांवर निर्णायक नुकसान केले आहे. त्यापैकी बहुतांश जागा मुंबईतील आहेत, त्यामुळे यूबीटीला आपले मुंबईतील स्थान राखता आले. वरळी, माहीम, वांद्रे पूर्व जागा महत्त्वाच्या ठरल्या. जर मनसेने दहा जागांवर निवडणूक लढली नसती तर येथे शिंदे गटाचा फायदा झाला असता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दहा जागा कमी झाल्या असत्या.