35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत वाढला संभ्रम

मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत वाढला संभ्रम

मुंबई : प्रतिनिधी
निवडणुका आल्या की मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा असतात. स्वबळावर मनसेला वेगळ््या उंचीवर नेलेले राज ठाकरे अलिकडे सोयीनुसार भूमिका बदलत आहेत. राज्यात मनसेची स्वतंत्र ओळख आहे. परंतु नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा विचार न करता मेळाव्यात तोफ धडाडते आणि मग ऐनवेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर निर्णय लादला जातो. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मूड वेगळा आहे. अशावेळी मनसेने स्वतंत्र भूमिका घेण्याऐवजी तळ््यात-मळ््यात करीत पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. अनेकांना हे रुचले नाही. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी संभ्रमात आहेत.

गुढीपाडव्या दिवशीच्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राज्यातील जनतेला होती. मात्र, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. होय, नाही म्हणत त्यांनी ऐनवेळी भूमिका जाहीर केल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. याबाबत उघडपणे कुणी बोलत नसले तरी सर्वत्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी परखड पोस्ट शेअर करत मनसेला जय महाराष्ट्र केला.

पाच वर्षांपूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राज ठाकरे यांनी भाजप-मोदी- शाहांविरोधात रणशिंग फुंकले होते, तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर लाव रे तो व्हीडिओ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते भाजप-मोदी-शाह यांच्या विरोधात जे तथ्य मांडत होते, त्यांबद्दल लेखन करून त्यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती चूक की बरोबर हे राजकीय विश्लेषक सांगू शकतील. परंतु त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणा-यांची कुचंबणा होते. त्याचे काय, असा सवाल उपस्थित करीत मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. अशीच नाराजी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मनसे नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकसंघ असणारे नेते आणि कार्यकर्ते यांना अजूनही मनसे महायुतीत पाठिंबा दिल्याचा निर्णय पटलेला नाही. त्यामुळे मनसे नेते सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची समजूत कशी काढणार, हे पाहणे आता पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपलाही फटका
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने राज्यातील महायुती सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने एकीकडे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले, तर दुसरीकडे मनसे भाजपसोबत आल्याने भाजपसोबत असलेले परप्रांतीय नाराज झाले. त्यामुळे भाजपमधील ब-याच परप्रांतीयांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR