पुणे : प्रतिनिधी
नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते ते आज रद्द करण्यात आले.
दरम्यान या प्रकरणात आज पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला आज मनोज जरांगे पाटील हजर होते. डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचा सल्ला दिल्यामुळे ते आज अॅम्ब्युलन्समधून कोर्टासमोर आले. कोर्टासमोर त्यांनी आपली प्रकृतीची माहिती देत अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. डॉक्टरांच्या अहवालावर आधारित कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले.
न्यायालयाचा अवमान आणि कोर्टाचे निर्देश
कोर्टाने जरांगेंना न्यायालयाचा अवमान पुन्हा करू नये, अशी ताकीद दिली आहे. काही माध्यमांमध्ये जरांगेंनी कोर्टाबद्दल अवमानकारक भाष्य केले होते. न्यायालयाने त्यांना बोलताना काळजी घ्यावी, अशी सूचना दिली आहे.
न्यायालयाची ऑर्डर
जरांगेंच्या प्रकरणात न्यायालयाने कायद्याचे योग्य पालन करत, जरांगेंच्या वैद्यकीय अहवालांची तपासणी केली. सरकारी वकिलांनी जरांगेंच्या अनुपस्थितीबद्दल आक्षेप नोंदविला होता, परंतु वैद्यकीय अहवालावरून कोर्टाने अटक वॉरंट रद्द केले. कोर्टाने जरांगेंना नव्याने बंद पत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकरणाची पुढील सुनावणी-
या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयाने जरांगेंना यावेळी न्यायालयाचा अवमान करू नये, अशी समज दिली आहे.