25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यातील धरणांत केवळ ९.६३ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यातील धरणांत केवळ ९.६३ टक्के पाणीसाठा

राज्यातील एकूण धरणांत २४ टक्के पाणीसाठा पाठीटंचाई सह उष्णतेच्या झळांनी हैराण

छ. संभाजीनगर/मुंबई : राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १० हजारांहून अधिक वाड्या, गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर मराठवाडा पाणीटंचाईच्या झळांनी हैराण झाला असून मराठवाड्यातील एकूण ९२० लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता केवळ ९.६३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षी हाच साठा ३९.३३ टक्के एवढा होता.

राज्यात मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतेक धरणे शंभर टक्के भरलीच नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातही राज्याच्या काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता हे संकट अधिकच गडद झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. जनावरांच्या चा-याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.

नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवनमरणाचा प्रश्­न असलेल्या दुष्काळाकडे मात्र डोळेझाक करण्यात आली. जलसंपदा विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मराठवाडा विभागात आज ६९९.३० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात आता ५.६५ टक्के पाणीसाठा उरला आहे. हिंगोलीमधील सर्वाधिक क्षमतेचे सिद्धेश्वर धरण शुन्यावर जाऊन पोहोचले आहे. तर येलदरी धरणातही आता २८.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धाराशिव जिल्ह्याची तहान भागावणारी बहुतांश धरणे आता शुन्यावर पोहोचली आहेत. लातूरमध्ये अशीच अवस्था असून टँकरने पाणीपुरवठा वाढला आहे. परभणीचे निम्न दुधना धरणही शुन्यावर गेले आहे.

आचारसंहितेत सुट मिळण्याची सरकारची मागणी
दुष्काळाबाबत विविध उपाययोजना करणे तसेच याबाबत सध्या सुरू असल्या वेगवेगळ्या योजनाही पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता शिथिल होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी सरकारने केली आहे. देशात सात टप्पे असून सातव्या टप्प्याचे मतदान १ जूनला आहे. तर चार जूनला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत देशात आचारसंहिता लागू असणार आहे. या कारणाने महाराष्ट्रात सरकारला दुष्काळासंबंधी उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत.

मान्सूनची प्रतीक्षा
राज्यात मराठवाडा विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असून मराठवाड्यानंतर पुणे, नाशिक कोकण विभागाचा धरणसाठा वेगाने कमी होत आहे. मान्सून राज्यात दाखल होण्यास अजून १५ दिवस शिल्लक असताना धरणसाठा वेगाने कमी होत आहे.

जनावरांच्या चा-याचा प्रश्न ऐरणीवर
जनावरांच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. परिणामी पशुधन संकटात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात पाण्याचे संकट अधिक गंभीर होत असून पावसाकडे सर्वांचे डाळे लागले आहेत. सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी हा पाऊस मुरवणीचा नसल्याने पाणीसाठ्यात फारसा फरक पडत नाही.

टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू
सध्या २९३४ गावे आणि ६५३९ वाड्यांवर ३६२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जास्त असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. यात केवळ ९३ टँकर सरकारी तर ३५२९ खासगी टँकर्स आहेत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १२३६ गावे, ४९८ वाड्या तर नाशिक विभागात ७४६ गावे आणि २५३६ वाड्या तहानल्या आहेत. येथे अनुक्रमे १८१२ आणि ८०३ टँकरद्वारे पाणीपुवरठा केला जात आहे. पुणे विभागातील ३७७५ वाड्या, ६२८ गावांना ७४८ टँकरद्वारे पाणीपुवरठा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR