पिकांना आधार, अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा
लातूर/नांदेड : प्रतिनिधी
मराठवाड्यात शनिवारी सायंकाळी ब-याच भागात पावसाने हजेरी लावली. पावसाळ््याच्या सुरुवातीला ब-याच भागात चांगला पाऊस झाला. परंतु मध्येच पावसाने दडी दिली होती. त्यामुळे मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा आणि आधून-मधून दाटून येणारे ढग असेच चित्र होते. त्यामुळे पावसाचा जोर दिसला नाही. परंतु शनिवारी सायंकाळी ब-याच भागात पाऊस सुरू झाला. त्यामुळे पिकांना आधार झाला आहे.
लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, बीड, जालना, छ. संभाजीनगरमधील ब-याच भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. परभणीत ढगाळ वातावरण होते. परंतु जिल्ह्यात तुरळक ठिकाणे वगळता फारसा पाऊस झालेला नाही. लातूरमध्ये सायंकाळी पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. परंतु लातूर शहर परिसर आणि औसा, रेणापूर वगळता इतरत्र पावसाचा जोर पाहायला मिळाला नाही. धाराशिवमध्येही सायंकाळी ढग दाटून आले. परंतु पावसात फारसा जोर नव्हता. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पावसाची आशा निर्माण झाली आहे. नांदेडमध्ये रात्री ९ च्या सुमारास पाऊस सुरू झाला. मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जिल्ह्यात ब-याच भागात पावसाने हजेरी लावली. बीडमध्येही काही भागांत पाऊस झाला. याशिवाय जालना, छ. संभाजीनगर जिल्ह्यातही साधारण पाऊस झाला.
बरेच प्रकल्प कोरडे
अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यात बहुतांश प्रकल्प कोरडेच आहेत. जोपर्यंत मोठा पाऊस होत नाही, तोपर्यंत प्रकल्पांतील पाणी पातळी वाढणार नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता कायम आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत ब-याच भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.