22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयमराठवाड्यात भूकंप!

मराठवाड्यात भूकंप!

मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांत तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यात १० जुलैच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर ४.२ अशी नोंद झाल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यात सकाळी सव्वा सातच्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत हा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचे दृष्य सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. हा भूकंप ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता अशी माहिती देण्यात आली. मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. सकाळी ७ वाजून ९ मिनिटांनी आणि ७ वाजून १४ मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी, कृष्णा या गावांत घरावरील पत्र्यांचा मोठा आवाज झाला. गोठ्यात बांधलेली गुरेदेखील भयभीत झाल्याचे पहावयास मिळाले.

या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लातूरच्या प्रलयंकारी भूकंपाच्या स्मृती अजूनही ताज्या असल्याने भूकंप म्हटला की लोकांच्या मनात धडकी भरणे साहजिक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १३ कि.मी. वरील दांडेगाव परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी घरांना भेगा गेल्याची माहिती आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक घाबरून घराबाहेर पडले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीतून गूढ आवाज येतात म्हणे. जालना जिल्ह्यातील परतूर व घनसावंगी तालुक्यात काही भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे भूकंपाचा धक्का जाणवताच न घाबरता तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेवर थांबावे असा सल्ला प्रशासन व जाणकार मंडळींनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे.

गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे, ज्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. नांदेड शहरातील श्रीनगर, भाग्यनगर, आनंदनगर, तरोडा नाका, सिडको-हडको, जुने नांदेड आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे काही व्हीडीओ समोर आले आहेत. एका व्हीडीओत जमीन हादरताना तर दुस-यात छताला लावलेला फॅन हलताना दिसला. भूमंडळ डळमळल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात होऊ घातलेला नासाचा प्रकल्प अन्य राज्यात स्थलांतरीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी नासा हिंगोली जिल्ह्यात ‘लिगो इंडिया प्रोजेक्ट’ उभारणार आहे. ही जगातील तिसरी सर्वांत मोठी प्रयोगशाळा असून औंढा तालुक्यातील दुधाळा, अंजनवाडा भागात या प्रयोगशाळेचे काम सुरू आहे. त्यासाठी १७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात अशी प्रयोगशाळा उभारता येत नाही. मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के हे भविष्यातील चांगल्या पावसाची चिन्हे असू शकतात असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

भूकंप हा चांगल्या पावसाचे लक्षण आहे. जेव्हा जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात, तेव्हा तेव्हा खूप पाऊस पडतो. लातूर जिल्ह्यातील किल्लारीला भूकंप झाला तेव्हा खूप पाऊस झाला होता. तशीच परिस्थिती यावेळीही होणार आहे असे डख म्हणाले. भूकंप झाल्यामुळे चांगला पाऊस होणार असेल तर असे धक्के वारंवार बसावेत परंतु ते ‘धीरेसे’ असावेत अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा राहील. भूगर्भातील हालचालींमुळे भूकंप होतात असे म्हणतात. निसर्गाचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या अद्भूत शक्तीवर मात करणे अशक्य आहे. परंतु माणसाला याचे भान राहत नाही. ज्ञानाच्या जोरावर आपण मात करू असे आपल्याला वाटते परंतु निसर्गावर विजय मिळवणे कधीच शक्य होणार नाही. हे सारे आपल्याला कळते परंतु वळत नाही! निसर्ग हा सातत्याने आपल्याला काही ना काही देत असतो परंतु आपण मात्र विकासाच्या नावाखाली त्याला सातत्याने ओरबाडत असतो.

निसर्गाच्या छाताडावर नाचण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा तडाखा हा बसणारच. मग तो त्सुनामीच्या रूपात, पुराच्या स्वरूपात अथवा प्रदूषणाच्या निमित्ताने बसतोच बसतो! आपल्या पूर्वजांनी निसर्गातल्या प्रत्येक घटकाला देवत्व बहाल केले आहे. हा निसर्गाच्या अदृश्य शक्तीचा आदर होता, सन्मान होता. आज आपण आदर तर सोडाच, साधी दखलही घेत नाही. म्हणून आपण संकटाचे धनी होतो. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचा कोप ओढवून घेत आहोत. अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती, रोगराई ही त्याचीच लक्षणे. सध्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई बनली आहे. अर्थात याला आपले कर्तृत्वच जबाबदार आहे. पावसाळ्यापूर्वी जी आवश्यक साफसफाई करावयास हवी होती ती झालीच नाही. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती ही कामे पावसाळी हंगामापूर्वी मनापासून आणि गांभीर्याने झालीच नाहीत. कारण जिथे तिथे भ्रष्टाचार आडवा येतो! सर्वशक्तिमान निसर्गाचा सन्मान केला तरच जीवनमान सुखकारक राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR