27.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ

सर्वपक्षीय बैठकीच्या बहिष्कारावरून सत्ताधारी-विरोधक भिडले
– विधान परिषदेत मार्शलला बोलावण्याची वेळ

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने मंगळवारी बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्काराचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत गदारोळ केल्यामुळे विधानसभेचे कामकाज ४ वेळा स्थगित करून अखेर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले तर विधान परिषदेत विरोधक व सत्ताधारी सदस्य वेलमध्ये समोरासमोर भिडल्याने खबरदारी म्हणून सभागृहात सुरक्षा रक्षकांना (मार्शल) बोलवण्याची वेळ आली. या गोंधळात उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समन्वयाने तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. भाजपाच्या अमित साटम, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे आदी सदस्यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करीत विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांना मराठा व ओबीसी या दोघांविषयीही प्रेम नाही, त्यांना फक्त राजकारण करायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. बैठकीला येणार, असा निरोप विरोधकांकडून आला होता; पण बैठकीच्या वेळेला का पळ काढला? बैठकीला जाऊ नका, असा कोणाचा फोन आला? कोणाचा एसएमएस आला? ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे की नाही हे स्पष्ट करावे. यावर महाविकास आघाडीची भूमिका काय? आरक्षणासाठी विशेष बैठक बोलवा, असे बाहेर सांगतात; पण आरक्षणाच्या बैठकीला येत नाहीत. यांचा बोलाविता धनी कोण आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराजे देसाई या मंत्र्यांनीही विरोधकांवर हल्ला चढवला. विरोधक आंधळे झाले आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने मराठा आरक्षणावर ब्रदेखील काढला नाही. मागली सरकारने दिलेले आश्वासन टिकले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण टिकले. समाजात दुही माजवण्याचे काम विरोधक करीत आहेत, अशी टीका विखे पाटील यांनी केली तर सर्वपक्षीय बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लेखी निमंत्रण पाठवले, फोन केले. काहींनी बैठकीची लिंक पाठवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतो सांगितले; पण आम्ही बैठकीला येणार नाही, असे संध्याकाळी ६ वाजता सांगितले. पावणे तीन तास बैठक झाली; पण महाविकास आघाडीचे नेते आले नाहीत, असा आरोप शंभूराजे देसाई यांनी केला. सत्ताधारी बाजूच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरू केली.

गोंधळातच पुरवणी
मागण्या, विधेयके मंजूर
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते याबाबत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत होते; पण आक्रमक सत्ताधारी सदस्यांनी त्यांना बोलूही दिले नाही. यामुळे चार वेळा कामकाज तहकूब करावे लागले. सत्ताधा-यांच्या गोंधळातच पुरवणी मागण्या आणि चार विधेयके मंजूर करण्यात आली. अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR