24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमराठा क्रांती मूक मोर्चा; आठ वर्षे सरली आरक्षण नाही

मराठा क्रांती मूक मोर्चा; आठ वर्षे सरली आरक्षण नाही

लातूर : प्रतिनिधी
१९ सप्टेंबर २०१६ रोजी लातूर जिल्ह्यात एक मराठा लाख मराठा या जाणीवेने एकत्र येत मूक मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने  मराठा आरक्षणासाठी शासनास विनंती केली होती तथापि एवढा प्रदीर्घ कालावधी उलटुनही हा प्रश्न मार्गी न लावल्याने सत्ताधारी व विरोधक दोघांचाही लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या  वतीने निषेध करण्यात आला. मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचे समर्थन करीत मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे तसेच निजाम गॅझेट लागू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूर येथे काढण्यात आलेल्या मूक मोर्चास १९  सप्टेंबर २०१४ रोजी आठ वर्ष पूर्ण झाले. त्या औचित्यावर घेण्यात आलेल्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध आंदोलनाच्या संदर्भाने  मंथन करण्यात आले. मराठा समाजाची स्थिती अत्यंत हलाखिची असून समाजातील बहुसंख्य बांधवांना रोजचा दिवस काढणे कसरतीचे झाले आहे. आरक्षणाअभावी युवक-युवतींची परवड होत आहे. पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च पालकांना परवडत नसल्याने अनेकांना अर्ध्यावर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. शिकुनही नौकरी मिळत नसल्याने हतबलतेने अनेक  युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक हतबलतेने अनेक पालकांनी मरणाला कवटाळले आहे.  अशा घटना अजुनही घडतच आहेत. हे सारे थांबवण्यासाठी मराठा समाजाला  ओेबीसीतून आरक्षण दिले पाहीजे व ते मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार यावेळी समाजबांधवांनी केला.
 मराठा समाजाचा वनवास केवळ टिकावू आरक्षणाशिवाय थांबणार नाही. असे असतानाही सत्ताधारी व विरोधक केवळ एकमेकांवर दोषारोप करीत या प्रश्नाचे राजकारण करुन तो ताटकळत ठेवत असल्याचे स्पष्ट करीत  सरकार व सत्ताधा-यांच्या या विसंगत मानसिकतेचा यावेळी समाजबांधवांनी  तीव्र निषेध केला. मराठा समाजास ओबीसीतून टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी  मनोज जरांगे पाटील प्राणांतीक उपोषण करीत आहेत ती मागणी तातडीने मान्य करावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR