मुंबई : वृत्तसंस्था
एकीकडे मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत असताना, दुसरीकडे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. आरक्षण आणि विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहेत. काहीही झाले, तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणा-या आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे. मराठा समाज शतकानुशतके समाजातील अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक, सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मराठा समाजाने नोकरी देणारे व्हावे : मराठा समाजातील तरुणांनी नोकरी देणारे व्हावे, असे सांगत, मराठा उद्योजक निर्मितीचा एक लाखाचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याबद्दल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे विशेष अभिनंदन केले. मराठा समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जवळपास ८२५ कोटी व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. महामंडळाने आणखी पाच लाख उद्योजक बनवावेत आणि या उद्योजकांनी २५ लाख नोक-या द्याव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.