ठाणे : मलंगगडाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन ते नक्कीच पूर्ण करणार, जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील असे आश्वासन शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. श्री मलंगगडाची मुक्ती लवकरच करणार असे आश्वासन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
कल्याण तालुक्यातील उसाटणे येथे हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वारक-यांना संबोधित करताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या मनामधील मलंगगडाबद्दलची इच्छा बोलून दाखवली आहे. येणा-या काळामध्ये आपल्या मनातली इच्छा, आकांक्षा आहे ती पूर्ण होईल. अफजलखानाचा कोथळा महाराष्ट्रात दोन वेळा काढण्यात आला, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तर दुस-यांदा प्रतापगडावरील अतिक्रमण काढून या सरकारने त्याचा कोथळा काढला. धर्माला पुढे घेऊन जाण्याचे काम आपण करत आहोत, तुमच्या माध्यमातून आपला धर्म, आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे काम सुरू आहे.
गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग किंवा मलंगगडाचा वाद सुरू आहे. यासंदर्भात संशोधन सुरू आहे आणि दोन्ही धर्मियांकडून वेगवेगळे दाखले देखील दिले जातात. या जागेचा उल्लेख हाजी मलंग, मलंगगड, श्रीमलंग, मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येतो. गेली अनेक वर्षे या प्रार्थनास्थळाबाबतीत चर्चा, आंदोलन आणि वाद सुरू आहेत. त्यामुळे हे स्थान नक्की दर्गा आहे की मंदिर हा एक वादाचा मुद्दा होऊन बसला आहे.
श्रीमलंगगड की हाजी मलंग, वाद काय आहे?
श्री मलंगगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंद्रनाथ यांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. ही बाजू सांगते की दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते, नैवेद्य अर्पण केला जातो. तर दुसरीकडे १३व्या शतकात येमेनहून आलेले सूफी संत फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग ऊर्फ मलंग बाबा यांची ही कबर असल्याचे दुसरी बाजू सांगते. दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक-एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. ८० च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे