28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रमलई खाण्याची महायुतीत स्पर्धा

मलई खाण्याची महायुतीत स्पर्धा

नाना पटोलेंचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
महायुती सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षांत सुरू असून, केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आताचे भाजपा युती सरकार असो, या मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षांत सुरू असून, केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, भाजपा युती सरकारचे मंत्रिमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे, एका मंत्र्यांवर न बोलता सगळ्यांवरच बोलले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते निश्चितच चिंताजनक आहेत पण हे सर्व भाजपाच करत आहे, भाजपाचाच आमदार खुलेआमपणे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल दररोज करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, शेतक-याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी बर्बाद झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करण्यात आले. ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे पण विरोधी पक्ष म्हणून या मुद्यांवर गप्प बसणार नाही, सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावी लागतील.

‘वर्षा’ बंगल्यात रेड्याची शिंगे पुरल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार देशात आल्यापासून मांत्रिक व्यवस्था देशात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्या मांत्रिक व्यवस्थेच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत आणि तोच प्रकार राज्यात आला आहे का? नरेंद्र मोदींसारखे आपणही पुढे येऊ म्हणून त्यांनी काही केले असेल आणि हे फडणवीसांना कळले असेल म्हणून ते ‘वर्षा’वर रहायला जात नाहीत का? माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा केला आणि तो कायदा असताना असे प्रकार घडत असतील तर लाजिरवाणी बाब आहे.

निवडणूक आयोगाकडून लोकशाहीचा खून
विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे काँग्रेस व मविआने आधीच उपस्थित केले आहेत. या प्रश्नी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे. निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खून केला आहे.

छत्रपतींचा अवमान करणा-यांचा बंदोबस्त करा!
भाजपा युती सरकारच्या काळात महापुरुषांचा सातत्याने अवमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान हे सरकार पाहत आहे हे दुर्दैवी आहे. सरकारच जर महापुरुषांचा अवमान करू लागले तर राहुल सोलापूरसारखे लोकही त्याच पद्धतीने सरकारच्या मागे भुंकत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणा-याला पायबंद घातलाच पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR