23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीयमला मोकळं करा!

मला मोकळं करा!

राज्यात महायुतीच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. या अपयशाची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या झालेल्या पीछेहाटीची जबाबदारी आपण स्वीकारली असून, उपमुख्यमंत्रिपद सोडून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्ष संघटनेत पूर्णवेळ काम करण्याची आपली इच्छा आहे. मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती द्यावी यासाठी पक्षश्रेष्ठींना विनंती करणार आहे.

ते जो आदेश देतील तो मला मान्य असेल, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याआधी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी सुकाणू समितीच्या नेत्यांची बैठक प्रदेश कार्यालयात बुधवारी दुपारी झाली. त्यात मतदारसंघनिहाय मुद्यांचा व मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला नव्हता. नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपला मनोदय व्यक्त केल्यानंतर भाजप व महायुतीत खळबळ उडाली. पदावर राहूनही पक्षकार्य करता येते, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सर्व घटक पक्षांची आहे, असे म्हटले. महायुतीच्या जागावाटपाचे गणित ठरविताना उमेदवारांच्या निवडीपासून काही प्रतिष्ठेच्या जागांवर अखेरपर्यंत घासाघीस झाल्याने किमान चार जागांवर थेट फटका बसल्याचे शिंदे गटात बोलले जात आहे.

उमेदवारांची निवड करताना भाजपने अवास्तव हस्तक्षेप केल्याचे सूर उमटत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात जोरदार फटका बसला. ४५ प्लसचा नारा देणा-या महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या. तर भाजपची ९ जागांवर घसरण झाली. भाजपमध्ये सर्व निर्णय पक्ष घेत असतो. मला आता विधानसभेच्या तयारीसाठी पूर्णवेळ उतरायचे आहे. त्यासाठी मला सरकारमधून मोकळे करावे आणि पक्षात पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी. पक्ष संघटनेत जर काही कमतरता असतील तर त्या मला दूर करता येतील. सरकारमधून बाहेर राहिलो तरी आम्हाला जे काही करायचे आहे ते आमची टीम करेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात पराभव झाला असला तरी मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात ४३.९१ टक्के मते महाविकास आघाडीला मिळाली तर ४३.६० टक्के मते महायुतीला मिळाली. महाविकास आघाडीला २.५० कोेटी मते मिळाली, आम्हाला केवळ २ लाख मते कमी पडली. मुंबईत २४ लाख मते महाविकास आघाडीला तर २६ लाख मते महायुतीला मिळाली आहेत. आमच्याविरुध्द संविधान बदलणार असा खोटा प्रचार करण्यात आला. संविधान बदलाचा अपप्रचार, मराठा आरक्षण देऊनही त्याबाबत झालेला अपप्रचार असे काही मुद्दे महायुतीच्या अपयशाला कारणीभूत होते, असे फडणवीस म्हणाले. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू केली आहे.

फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदावरून मोकळे करण्याचे आवाहन पक्षाला केल्याने त्यांना राज्यातून दिल्लीत आणले जाण्याची शक्यता आहे. मोदी मंत्रिमंडळात फडणवीसांना मंत्री किंवा पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. असो. पक्षश्रेष्ठींना पदमुक्तीची विनंती करणारे देवेंद्र फडणवीस यांनी गत अडीच वर्षांत सत्तेसाठी गलिच्छ राजकारण सुरू केले होते. शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पाडून सत्ता मिळविली होती. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा लावून त्यांना आपल्या पक्षात घेतले होते. त्यामुळे फडणवीस यांच्याबद्दल जनतेत प्रचंड रोष होता. जनतेला हे राजकारण पटलेले नव्हते आणि त्याचाच स्फोट या लोकसभा निवडणुकीत झाला. आता फडणवीस पदमुक्त होऊन पक्ष संघटनेसाठी काम करणार की पुन्हा विरोधी पक्षातील आमदार फोडण्याचे प्रयत्न करणार, असा प्रश्न जनतेला पडला असेल. कारण आता फडणवीस यांच्यावर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. राज्यात भाजपला मोठा फटका बसला, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. उलट जो करिष्मा घडणार होता, तोच घडला. याचे कारण म्हणजे जनता भाजपच्या मनमानी आणि धाकधपटशाच्या कारभाराला कंटाळली होती.

या निवडणुकीत मोदींना त्यांचा अहंकार नडला. ढेकीत ऊठ की सूठ काँग्रेसवर अवास्तव टीका करणे जनतेला आवडले नाही. मोदींचा चार बोटे हवेत चाललेला रथ मतदारांनी जमिनीवर आणला. मोदी म्हणाले होते, काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. त्याचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. त्यांना ४० जागाही मिळणार नाहीत. त्याच काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत ७५ टक्के यश मिळवून मोदींना सणसणीत चपराक लगावत त्यांची बोलतीच बंद केली आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेद्वारे जनतेशी साधलेला संवाद, निवडणुकीदरम्यान घेतलेल्या सभा हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. मोदींनी ठाकरे शिवसेनेवर तोंडसुख घेताना त्यांना ‘शिल्लक सेना’ असे संबोधले होते. त्याच शिवसेनेने आपण लेचेपेचे नसून पोलादासारखे मजबूत आहोत हे सिध्द केले आहे.

मतदारांनी एकाधिकारशाही, अहंकार आणि ‘मी’ पणाला लगाम घातला आहे. तोडफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही. नकारात्मक आणि दडपशाहीचे राजकारण जनतेने नाकारले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहविभागाला सतत आलेले अपयश, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, बेकायदा होर्डिंग दुर्घटनेतील बळी, पुण्यात अल्पवयीन मुलाच्या बेदरकार वर्तनामुळे झालेला कार अपघात, डोंबिवलीत रसायन कारखान्यात झालेला स्फोट अशी अनेक कारणे फडणवीसांना राजीनामा देण्यास पुरेशी होती. तेव्हाच त्यांनी पदाचा राजीनामा का दिला नाही? आता निवडणुकीतील अपयशाचे कारण देत राजीनामा देण्यास तयार झाले आहेत. लबाड लांडग्याचे हे ढोंग जनतेच्या लक्षात येत नाही असे नाही!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR