21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी हवी

मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी हवी

मुंबई : प्रतिनिधी
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी अखेर शनिवारी रात्री उशीरा जाहीर झाली. आता पालकमंत्री बदलावरून राजकारण होत आहे. खात्यातला मोठा मलिदा कोणाला मिळणार, जिल्ह्याचा आणि जनतेचा विकास राहिला दूर आधी स्वत:चा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड सुरू आहे अशी टीका काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान, निवडणुकीत संपूर्ण आणि विक्रमी बहुमत मिळूनही महायुती सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरण्यासोबतच, मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपदांचे वाटप अशा सगळ्याच गोष्टींमध्ये बराच वेळ गेला. आणि आता पालकमंत्रिपदासाठी देखील ब-यापैकी वेळ घेतला गेला.

रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर महायुतीतील धुसफूस अगदी चव्हाट्यावर आली आहे. या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासूनच सुंदोपसुंदी सुरू होती. आता पालकमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये पुन्हा राडा झाला आहे. कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना आमदार भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी आग्रही असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. यामुळे शनिवारी रात्री भरत गोगावले समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी ठिकठिकाणी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला.

तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून देखील शिंदेंचे मंत्री नाराज आहेत. तेथेही धुसफूस सुरू आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटी दावोसला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेथून सूत्रे हलवत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी लागली आहे. महायुती सरकारवर आलेल्या या नामुष्कीवरून आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. एकीकडे ठाकरे गटाने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सरकारवर तोंडसुख घेतले तर दुसरीकडे कॉंग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. तशी पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

एका रात्रीत पालकमंत्री बदलले
जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे की मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी हवी, असा संतप्त सवाल वडेट्टीवर यांनी सरकारला केला आहे. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही आज महायुती सरकारची ही अवस्था आहे. ५० दिवसांनंतर या सरकारने जिल्ह्याला पालकमंत्री दिले. त्यात ही आता एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की सरकारवर आल्याचा टोला देखील त्यांना लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR