लातूर : प्रतिनिधी
महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनूसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागु करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी दि. १५ जुलैपासून संपावर आहेत. महसूल कर्मचा-यांच्या संपामुळे या विभागाचे कामकाज गेल्या आठ दिसांपासून ठप्प आहे.
आपल्या मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील सुमारे ३४२ महसूल कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनूसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागु करण्यात यावा, अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत, महसूल विभागाचा आकृतिबंध तत्काळ मंजूर करुन पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तत्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसूल सहायकांचा ग्रेडपे १९०० वरुन २४०० करण्यात यावा, महसूल सहायक व तलाठी यांना सेवांतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागु करण्यात याव्यात, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समकक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणी अधिकारीमार्फत करण्यात यावी, आदी मागण्या महसूल कर्मचा-यांच्या आहेत.
महसूल कर्मचारी संपावर गेल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. सध्या नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी, राष्ट्रीयत्व, ईडब्ल्यूएस, असे काही प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. पण सध्या संप सुरु असल्याने हे प्रमाणपत्र मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.