सोलापूर-
शहरात मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केली नाहीत. वरवरची ही कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे नाले तुडुंब भरून घराघरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. दबाव नसल्याने महापालिकेच्या कामात हलगर्जीपणा दिसून येत आहे. तेव्हा तत्काळ पुन्हा एकदा महापालिकेने शहरातील नाल्यांची साफसफाई करावी, अशी सूचना काँग्रेसच्या नूतन खा. प्रणिती शिंदे यांनी केल्या आहेत.
काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील विविध ठिकाणच्या प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उप अभियंता नीलकंठ मठपती, झोन अधिकारी हिबारे,
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक बावा मिस्त्री, विनोद भोसले, माजी नगरसेविका आशा म्हेत्रे, मनोज यलगुलवार, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. खा. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, गेल्या दोन वर्षापासून सोलापूर महापालिकेची निवडणूक झाली नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवट आहेत. त्यामुळे दबावा अभावी महापालिकेच्या कामात हलगर्जीपणा दिसत आहे.
दरवर्षी सोलापुरात मे महिन्यात नाले सफाईची कामे केली जातात. सोलापुरात सप्टेंबर मध्ये पाऊस होतो पण अलीकडच्या पाच वर्षाच्या काळात लवकर पाऊस होत आहे. यादरम्यान, मान्सूनपूर्व कामे होणे गरजेचे आहेत. सर्व प्रमुख नाल्यांची पाहणी केली. असता नालेसफाईची कामे वरवरची झाल्याची दिसून येते. खोलवर सफाई झाले नाही. त्यामुळे शहरातील नाले ओवर फ्लो झाले. ड्रेनेज तुंबले. लोकांच्या घरात पाणी शिरले. घरातून पाणी येते, असे खा. शिंदे यांनी सांगितले.