भुजबळ बंडाच्या तयारीत, ‘जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना’
-मुनगंटीवार नाराज, शिवतारे, सावंत दुखावले, भोंडेकरही आक्रमक
नागपूर : प्रतिनिधी
तब्बल तीन आठवडे विचारमंथन करून झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने महायुतीतील तिन्ही पक्षात नाराजीची लाट आली असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिंदे सेनेचे विजय शिवतारे, नरेंद्र भोंडेकर आदींनी आज उघडपणे आपली खदखद व्यक्त करत पक्ष नेतृत्वावर टिकास्त्र सोडले. छगन भुजबळ यांनी तर ज्या पद्धतीने आपल्याला वागणूक दिली गेली आणि आणि अपमानित करण्यात आले, त्यामुळे मी दु: खी असून, जहॉं नही चैना, वहा नहीं रेहना, असे सूचक वक्तव्य करत बंडाचे इशारे दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळाल्यानंतरही महायुतीला पूर्ण मंत्रिमंडळ बनवण्यासाठी तब्बल तीन आठवड्याचा कालावधी लागला. अखेर रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार करून ३९ जणांचा समावेश करण्यात आला. महायुतीतील तिन्ही पक्षांनी काही ज्येष्ठ मंत्र्यांसह तब्बल १२ जणांना डच्चू दिला. त्यामुळे ते नाराज झाले असून, मंत्री पदाच्या आशेवर असलेल्या डझनभर लोकांची घोर निराशा झाली आहे. एका पाठोपाठ एका नाराजाची खदखद बाहेर यायला लागली असून, छगन भुजबळ यांनी तर आज पक्ष नेतृत्वावर टीकेची थेट तोफ डागली. छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आज स्वत: भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. भुजबळ यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून, मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
ज्या पद्धतीने मला वागणूक दिली आणि अपमानित केले गेले त्यामुळे मी दुखावले असल्याचे सांगितले. मी सातवेळा आमदार म्हणून निवडून आलो. मंत्रिमंडळात मला समाविष्ट न केल्यामुळे राज्यात ओबीसी, इतर मागासवर्गीय आणि मतदारसंघातील लोक फार क्रोधित आणि दु:खी झालेले आहेत. लोक रस्त्यावर यायला लागली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांना काही सांगायला पाहिजे. त्यामुळे बुधवारी प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
केवळ मंत्रीपद दिले नाही म्हणून नाराज नाही. माझ्यासाठी अनेक वेळा अशी मंत्रिपदे आली आणि गेली. एकटा शिवसेनेचा आमदार असताना ८५ ते ९० जणांना अंगावर घ्यायचे काम केले आहे. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केले जाते त्यावरुन मी दु: खी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा मी होतो आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हाही त्यांच्यासोबत राहिलो. सर्वांचे वार मीच झेलले. येवल्याला शरद पवार यांनी माझ्या विरोधात सभा घेतली. ओबीसीचा लढा झाला. त्यावेळी कुणीच बोलत नव्हते. त्यावेळी मी आवाज उठविला. आता ‘जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना’, असे सूचक वक्तव्य करत भुजबळ यांनी बंडाचे सूतोवाच केले.
राष्ट्रवादी व भाजपाप्रमानेच शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजीचे पी फुटके आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण केला नाही, अशी नाराजी भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही मंत्रीपद न मिळाल्याने संताप व्यक्त केला. माझ्यासाठी मंत्रिपद इतके महत्त्वाचे नाही. मला लोकांनी निवडून दिले, मला त्यांच्यासाठी काम करायचे आहे. पण ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन काम करायला हवे, ते झाले नसल्याचे शिवतारे म्हणाले.
मुनगंटीवार यांची खदखद बाहेर
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे नाराज आहेत. मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही अशी जाणीव मला कुणीही करुन दिली नाही. मी संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. माझं नाव मंत्रिमंडळात आहे हे सांगण्यात आले होते. मी मंत्रिमंडळात नाही हे मला जाणवलंही नाही. पण कसे वगळले माहीत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाही
आम्ही कार्यकर्ते म्हणजे कोणी गुलाम नाहीत ना? नाराजीचे कारण हे आहे, की महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी सौजन्यसुद्धा दाखवले नाही. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. विभागीय समतोलापेक्षा जातीय समतोलाला प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप शिवतारे यांनी केला.
मी तुमच्या हातातील
खेळणे आहे का?
मी अनेक पदे भूषविली आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदही. मी काही मंत्रिदावरून नाराज नाही. मला ज्या पद्धतीने पक्षात वागणूक दिली जात आहे, त्यामुळे मी नाराज आहे. मी काय तुमच्या हातातील खेळणे आहे का, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला.