पुणे : प्रतिनिधी
पाण्याच्या प्रश्नावर धोरणात्मक बदल आणि समाजात जागरूकता निर्माण झाली पाहिजे. याबाबत शासनासह सर्व संबंधित घटकांनी यावर एकत्रित विचार करावा आणि कार्यवाही करावी असा सूर एकदिवसीय परिषदेत काढण्यात आला आहे.
‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेतर्फे आयोजित ‘महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती समस्या आणि उपाय’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पशुसंवर्धन विभागाचे विभाग सचिव तुकाराम मुंडे, माजी कुलगुरु डॉ.अरुण जामकर,जलसंपदा विभागाचे माजी सचिव डॉ.दि.मा.मोरे,यांच्या हस्ते झाले. ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’चे अध्यक्ष शशिकांत पाटील, पुण्याचे आयकर आयुक्त संग्राम गायकवाड यांच्या उपस्थित होते व्यासपीठावरील रोपाला पाणी अर्पण करून परिषदेचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले.
पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित विषयांवर चर्चासत्रे,सादरीकरणे,खुली चर्चा असे या एकदिवसीय परिषदेचे स्वरूप होते.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित कार्यक्षेत्रात काम करणा-या व्यक्ती, संस्था, अभ्यासक,अधिकारी सहभागी झाले.
परिषदेचे उद्घाटन सत्रात संग्राम गायकवाड यांनी ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेच्या कामाची माहिती दिली. प्रकाश मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. समीर शिपुरकर यांनी सूत्रसंचालन केले.उद्घाटन सत्रात तुकाराम मुंडे, डॉ. दि. मा. मोरे, माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी विचार मांडले.
‘बिगर शासकीय घटकांद्वारे पाणी व्यवस्थापन: धोरण आणि अंमलबजावणी’ या चर्चासत्रात डॉ. एस. ए. कुलकर्णी, शहाजी सोमवंशी , रविंद्र उलंगवार , प्रांजल दीक्षित सहभागी झाले. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार हे अध्यक्षस्थानी होते.