16.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeसंपादकीयमहाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’?

महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’?

विधानसभा निवडणुकीत राक्षसी बहुमताने विजयी झालेल्या भाजपप्रणीत महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून पेच निर्माण झाला आहे. निकाल लागून तीन दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा तिढा महायुतीला सोडवता आलेला नाही. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उत्सुक असले तरी राज्यातील हे सर्वोच्च पद भाजपकडेच राहील असे दिसते. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यास भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह तमाम भाजप नेत्यांची इच्छा असली तरी भाजपकडून विनोद तावडे यांच्यासह चंद्रकांत पाटील हे सुद्धा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे सेनेच्या नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. किमान अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. फडणवीस यांची मराठाविरोधी अशी प्रतिमा तयार झाल्यामुळे राज्याची कमान एखाद्या मराठा नेत्याकडे सोपवावी असाही सूर भाजपमधून निघतो आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे समजल्या जाणा-या चंद्रकांत पाटील यांच्याकडेही मुख्यमंत्रिपद सोपवले जाऊ शकते अशीही चर्चा आहे. या सा-या घडामोडींमुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर पडला आहे. राज्यात निवडणूक प्रचारसभांमध्ये अमित शहा यांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले होते. भाजपने गेली अडीच वर्षे त्याग केला आहे, आता तुम्ही त्यागासाठी तयार रहा असे शहा यांनी शिंदे यांना थेट प्रचारातच सुनावले होते. राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतरही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मुख्यमंत्रिपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सोमवारी दिल्लीत बोलावण्यात आले होते. त्यानुसार फडणवीस दिल्लीला रवाना झाले मात्र,

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाणे टाळले. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक असल्याने राज्यात ‘बिहार पॅटर्न’ राबविला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याकडे कमी जागा असूनही त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे तर भाजपकडे उपमुख्यमंत्रिपद आहे. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा असा भाजपमध्ये मतप्रवाह आहे. राज्यात ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ हा निर्णय दिल्लीवरूनच होणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करतील असे दिसते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँगे्रस (अजित पवार गट) यांनी लगेच आपापले विधिमंडळ नेते जाहीर केले. मात्र सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने आपला विधिमंडळ पक्षनेता जाहीर केलेला नाही. म्हणजेच भाजपने मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र, भाजप हायकमांड मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगडप्रमाणे चर्चेत नसलेला चेहरा मुख्यमंत्रिपदावर आणू शकते अशीही चर्चा आहे. विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्यामुळे शिंदे यांना नाराज करता येणार नाही असेही भाजपमधील काही नेत्यांचे मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेमुळेच महाराष्ट्रात महायुतीला सर्वांत मोठा विजय मिळवता आला, अपेक्षेपेक्षाही मोठे यश महायुतीला मिळाले. या यशाचे शिल्पकार असलेल्या एकनाथ शिंदे यांना नाराज करू नये अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मांडली आहे म्हणे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

त्या निवडणुकीत चांगली कामगिरी करायची असेल तर शिंदे यांच्याकडेच नेतृत्व असणे चांगले असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपमधील एक मोठा गट फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहे. कारण फडणवीस यांनी अथक परिश्रम करून भाजपला मोठा विजय मिळवून दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. हा निर्णय महायुतीतील मित्रपक्ष एकत्र बसून घेणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपतो. त्यामुळे या तारखेपर्यंत नवे सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. परंतु आता तसे होणार नाही असे दिसते. कारण केंद्रात भाजपची सत्ता आहे! ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. विधानसभेचा निर्णय लागल्यानंतर सर्वपक्षीय विजयी आमदारांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली होती.

मंत्रिपदासाठी या आमदारांच्या हालचाली सुरू होत्या. भाजपने अद्याप गटनेत्याची निवड केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदे, भाजपचा नवीन नेता उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असे चित्र दिसू शकेल असेही म्हटले जात आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजप हायकमांडच्या मनात काय आहे याचा अजूनतरी थांगपत्ता लागलेला नाही. कदाचित २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नवे सरकार सत्तेवर आल्याचे दिसू शकेल. बिहारची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडेल काय यासंबंधी बोलताना भाजपचे रावसाहेब दानवे म्हणाले, प्रत्येक राज्याचे राजकारण वेगळे असते, बिहारमध्ये जे झाले ते येथे होणार नाही. बहुमत मिळूनही सत्तास्थापनेबाबतचा घोळ मिटत नाही ही गोष्ट अनाकलनीय आहे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR