मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने प्रचारासाठी तयार केलेल्या मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी या शब्दांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने ते वगळण्या संदर्भात नोटीस दिली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीसवर संताप व्यक्त केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या अशा एकतर्फी कारवाईने उलट महाराष्ट्र चिडून मतदान करेल, अशा इशारा सोशल मिडियाच्या माध्यमातून दिला आहे. निवडणूक आयोगाला आमचे प्रचारगीत ऐकून जळजळ उठली आहे.
त्या गाण्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत भवानी मातेचे जयघोष यांना चालत नाहीये! महाराष्ट्रात आई भवानीचे नाही तर मग कोणाच्या नावाचा जयघोष करायचा? या असल्या द्वेषाने भरलेल्या खलीत्याला आम्ही भीक घालत नाही. हा भाजपच्या इशा-यावरून महाराष्ट्राची अस्मिता दाबण्याचा प्रकार आहे. सहन करणार नाही, महाराष्ट्र उलट चिडून मतदान करेल.. जय भवानी! जय शिवराय!! अशा शब्दात दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईवर टीका केली.
शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन मशाल प्रचार गीतामधून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी’ हे शब्द काढून टाकावे, अशी नोटीस निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल माध्यमांना दिली होती.
यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला होता.
मी ‘हिंदू’ धर्म सोडल्याची टीका करणा-या राज्यकर्त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे. त्यांनी सांगावे ‘हिंदू’ धर्म हा शब्द काढायला लावणं योग्य आहे का? आम्ही कुठेही ‘हिंदू’ धर्माच्या आधारावर मत मागितले नाही. आम्ही ‘हिंदू’ धर्म सोडले हे आवाई उठवणा-या आणि चाकर असलेल्या निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिले पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीसीवर भाष्य करणारे ट्विट केले.