मुंबई : प्रतिनिधी
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची काल घोषणा झाली. त्यानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. त्यातच बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे मायावतींचा फटका महाविकास आघाडी-महायुतीला कोणाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या संदर्भात मायावतींनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवेल. यामुळे बसपा या दोन राज्यांमध्ये कोणासोबतही युती करणार नाही. हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बसपातील लोक इकडेतिकडे न भटकता पूर्णपणे बसपाशी प्रामाणिक राहतील आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचा मान ठेवतील. शिवाय सत्तेत येण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवतील, असेही मायावतींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.