लातूर : प्रतिनिधी
घरगुती वीज ग्राहकांपासून ते औद्योगिक ग्राहकांना ऊर्जा देणा-या महावितरणच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सामाजिक भान जपत हुडहुडी भरणा-या थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने बसस्थानक, रेल्वेस्टेशनवरती निराधाराचे जीवन जगणा-या माणसांना ब्लँकेटचे वाटप करुन त्यांना मायेची ऊब दिली. सर्वत्र तापमानाचा किमान पारा दिवसें दिवस १५ अंशांपर्यंत खाली येत असून वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. यामुळे नागरिकांना हुडहुडी भरु लागली आहे. अशा परिस्थितीत उघड्यावर रात्र काढणा-यांना थंडीपासून बचावासाठी कोणतेच साधन उपलब्ध नसते.
याची दखल घेत महावितरणच्या शाखा क्रमांक तीन मधील सहाय्यक अभियंता राहुल गाडे यांच्या पुढाकाराने व विनोद मुंडे, गायकवाड, मारोती मुंडे, बालाजी माने, लक्षमन गायकवाड, विशाल मृगजळे, मोतीपल्ले या कर्मचा-यांच्या सहाय्याने स्वत: वर्गणी गोळा करून लातूर शहरातील फुटपाथ, बस स्थानक, रेल्वे स्थानक, पार्किंग, मंदिर परिसर आदी विविध ठिकाणी उघड्यावर झोपलेल्या थंडीत कुडकुडणा-या निराधार व बेवारस व्यक्तींना रात्री फिरुन ब्लॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी ६० जणांना या माध्यमातून मायेची ऊब मिळाली. जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा या उक्तीची जाणीव महावितरणच्या ऊर्जावान अधिका-यांकडून प्रचितीस आली. या संवेदनशील कार्याबद्दल सहायक अभियंता राहूल गाडे व त्यांच्या संपुर्ण टीमचे कौतूक होत आहे.