28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहिन्याला १३ लाख युवक बेरोजगार, दिवसाला ३० शेतकरी संपवितात जीवन

महिन्याला १३ लाख युवक बेरोजगार, दिवसाला ३० शेतकरी संपवितात जीवन

- माओवाद्यांचा पत्रकातून दावा

गडचिरोली : नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे सामान्य जनता हैराण आहे. दहा वर्षांत ८ लाख लघुद्योग बंद पडले. त्यामुळे २ कोटी लोकांचा रोजगार हिरावला. सध्या महिन्याला १३ लाख बेरोजगारांची भर पडत आहे, तर दर दिवशी ३० शेतकरी बेरोजगारी- कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत.

त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाच समर्थन नको, मतदानावर बहिष्कार घाला, असा फतवा माओवाद्यांनी काढला आहे. १३ एप्रिलला जारी केलेल्या पत्रकातून भाजपसह सर्वच पक्षांना लक्ष्य केले आहे.

भारत कम्युनिस्ट पार्टी (माओवादी ) दक्षिण सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता समता याने हे पत्रक जारी केले आहे. त्यात १९ व्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या उदात्तीकरण व जागतिकीकरण धोरणामुळे देशावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. जागतिकीकरणाच्या माध्यमातून धनदांडग्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला आहे.
छत्तीसगडचे हसदेव जंगल अदानी ग्रुपच्या हवाली केले आहे. ३३ टक्के जंगलक्षेत्र हवे, पण देशात सध्या हे क्षेत्र २१ टक्केच वनक्षेत्र उरले आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सरकार सत्तारूढ होताच कॉर्पोरेट क्षेत्राच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याची गरज आहे. ७७ वर्षांत तेच प्रश्न आहेत, ते काही सुटले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीवर बहिष्कार टाका व नवजनवादी राज्य निर्माणात साथ द्या, असे आवाहन माओवाद्यांनी केले आहे.
टुरीझम सेंटर कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा विचार

अयोध्या-काशी, द्वारका, मथुरा, उज्जैन, कांशीपूरम ही महत्त्वाची देवस्थाने टुरीझम सेंटरच्या नावाखाली कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा घाट घातला जात आहे. १५ वर्षांपर्यंत कॉर्पोरेट कंपन्यांकडून कुठलाही कर आकारू नका, असे आवाहन केले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस कॅम्प उघडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR