लातूर : प्रतिनिधी
महिलांची सुरक्षा ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. आपल्या संस्कृतीत महिलांना नारीशक्ती म्हटले जाते. त्यामुळे या नारीशक्तीच्या सन्मानासाठी आपण सर्वजण संवेदनशील आणि सजग राहूया, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात शहरातील शाळा, महाविद्यालये, दवाखाने, उद्योग, वाहतूक संघटना यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, पोलीस उपअधीक्षक भातलवंडे यावेळी उपस्थित होते.
आपला लातूर जिल्हा हा संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारा जिल्हा आहे. आपली हीच ओळख कायम राहावी, यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षितेसाठी पुढाकार घेवूया. आपल्या दवाखान्यात, कार्यालयात, उद्योगकिंवा कोणत्याही आस्थापनेत काम करणा-या महिला, तसेच शाळा व महाविद्यालयातील मुलींची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आस्थापनेने आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. या सर्वांचे हक्क, अधिकार अबाधित राहतील, त्यांच्यासोबत कोणीही गैरकृत्य होणार नाही, यासाठी योग्य खबरदारी घेतली जावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या. तसेच असे गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.