विलासनगर : प्रतिनिधी
मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सातत्याने शेतक-यांच्या हिताला प्राधान्य दिले असुन साखर उद्योगात सक्षम व यशस्वी साखर कारखाने म्हणून मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची देशभरात ओळख आहे. विद्यमान २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, विलास साखर कारखाना युनिट-१ या तीन साखर कारखान्याकडून किमान दर प्रति टन ३ हजार रुपये देणार असल्याची माहिती मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी मांजरा कारखाना येथे साखर पोते पूजन प्रसंगी मंगळवारी येथे बोलताना दिली आहे. त्यामुळें लातूर, रेणापूर तालुक्यांतील उस उत्पादक शेतक-यांना अधिक भाव मिळणार आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील साखर कारखान्यांनी विद्यमान गळीत हंगामात २०२४-२५ साठी गाळप झालेल्या ऊसाला पहिली उचल २७०० रुपये दिलेले आहे. विद्यमान वर्षी उत्तम पाऊस असल्याने साखर उतारा चांगला प्राप्त होत आहे. त्यामुळे निश्चितच ऊसदर हा किमान ३ हजार रुपये असणार असुन हंगाम समाप्ती नंतर जर ३ हजारांपेक्षा अधिक दर निघत असेल तर तो देखील दिला जाईल, असे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सांगीतले.
यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील उत्पादित २,२२,२२२ व्या (५० किलो) साखर पोत्याचे पुजन मांजरा परिवाराचे मार्गदर्शक तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, रेणाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणाचे संचालक प्रविण पाटील, जिल्हा काँग्रेस समन्वयक सचिन दाताळ, जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, प्रा. शशीकांत देशमुख, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष दयानंद बिडवे, बाळासाहेब जाधव, विकास देशमुख, कारखान्याचे संचालक सूर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे (पवार), तात्यासाहेब देशमुख, धनराज दाताळ, ज्ञानेश्वर पवार, अशोक काळे, कैलास पाटील, वसंत उफाडे, नवनाथ काळे, बंकट कदम, शेरखां पठाण, सदाशिव कदम, अनिल दरकसे, विशाल पाटील, शंकरराव बोळंगे, बाबुराव जाधव, ज्ञानेश्वर भिसे, महेंद्रनाथ भादेकर, विलास चामले, श्रीनिवास देशमुख, कार्यकारी संचालक पंडित देसाई, सर्व खाते प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.