लातूर : प्रतिनिधी
स्व. कांतीलाल कुचेरिया यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ मिड टाउनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. या चित्रकला स्पर्धेत येथील माऊली विद्यार्थी विकास केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत लातूर जिल्ह्यातून तब्बल १२५ शाळांचा सहभाग होता. या चित्रकला स्पर्धेत एकूण ३५०० विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. इयत्ता पहिली ते दहावी अशा विविध गटांमधून ही स्पर्धा घेण्यात आली.
या सर्व विद्यार्थ्यांमधून मोठ्या गटातून या माऊली शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालीत माऊली विद्यार्थी विकास केंद्र, लातूरची इयत्ता आठवीमधील विद्यार्थिनी देशपांडे अबोली विश्वास हिने सर्वोत्कृष्ट चित्राचा प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व चापसी सायकल वर्ल्डच्या वतीने हिरो कंपनीची सायकल बक्षीस देण्यात आली. चित्रकला शिक्षिका भाग्यश्री उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अबोलीने हे अद्वितीय यश संपादन केले. विद्यालयाने दुस-या वर्षी प्रथम क्रमांक येण्याचा मान पटकावला. यशस्वी विद्यार्थीनिचे संस्था सचिव गंगाधर आरडले, कोषाध्यक्ष तानाजी बेवनाळे पाटील, प्राचार्या कविता आरडले, उपप्राचार्य भाग्यश्री काळे व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.