लंडन : इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्राहम थोर्प यांचं निधन झालं. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोर्प हे इंग्लंडकडून एकूण १०० कसोटी सामने खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर ते इंग्लंडच्या क्रिकेट संघाच्या कोंिचग स्टाफमध्येही होते. इंग्लंडकडून आतापर्यंत फक्त १७ खेळाडूच १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकले आहेत.
थोर्प यांनी १०० कसोटी सामन्यात ४४.६६ च्या सरासरीने ६ हजार ७४४ धावा केल्या होत्या. यात त्यांनी १६ शतकंही झळकावली होती. थोर्प यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र फारशी चमक दाखवता आली नाही. ८२ एकदिवसीय सामन्यात ३७.१८ च्या सरासरीने त्यांनी २ हजार ३८० धावा केल्या. यात त्यांनी २१ अर्धशतकं केलं होती.
इंग्लंडच्या संघात खेळताना थोर्प यांनी १९९३ ते २००५ या कालावधीत १०० कसोटी सामने खेळले. यानंतर ते इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षकही होते.
२०२२ मध्ये थोर्प हे अफगाणिस्तानचे प्रमुख प्रशिक्षक होते. पण काही दिवसांनीच त्यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली होती. आजार कोणता याबद्दल मात्र काहीच सांगण्यात आले नव्हते. २०२२ मध्ये थोर्प यांच्या कुटुंबियांनी त्यांचा खासगीपणा जपावा असं आवाहन केलं होतं. पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच थोर्प यांनी शतक केलं होतं.
जून २०२२ मध्ये ग्राहम थोर्प हे आजारी असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्स न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ग्राहम थोर्प यांच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. स्टोक्स न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक करायला आला तेव्हा त्याच्या जर्सीवर थोर्प असं लिहिलं होतं. तर कसोटी कॅपचा नंबरही जर्सीच्या मागे छापण्यात आला होता.