16.5 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूर‘माझं लातूर परिवाराच्या’ अनोख्या आंदोलनाने लातूरकरांचे लक्ष वेधले

‘माझं लातूर परिवाराच्या’ अनोख्या आंदोलनाने लातूरकरांचे लक्ष वेधले

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी करीत माझं लातूर परिवाराने चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे मुखवटे घालत भीक मागून निधी गोळा केला. या अनोख्या प्रतीकात्मक आंदोलनाने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
शहरातील गांधी चौक येथून सकाळी १०.३० च्या सुमारास या प्रतीकात्मक भीक मागो आंदोलनास सुरुवात झाली. माझं लातूर परिवारातील सदस्यांनी यावेळी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मुखवटे घातलेले होते. जिल्हा रुग्णालय झालेच पाहिजे, अशा घोषणा देत व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून जिल्हा रुग्णालयासाठी भीक मागण्यात आली. गांधी चौक, बसस्थानक, हनुमान चौक ते गंज गोलाईपर्यंत हे आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून मंजूर असूनही प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी माझं लातूर परिवाराने २ ऑक्टोबर २०२३ पासून शासनदरबारी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती. बेमुदत साखळी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले. चक्क मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना साकडे घातले.
 जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी विनंती केली होती. जिल्हा रुग्णालयाच्या या आंदोलनात लातूरच्या सर्व सुजाण नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या आंदोलनात परिवारातील पत्रकार, संपादक, समाजसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR