21.1 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमाझगाव आणि बांद्रा-कुर्ला सर्वाधिक प्रदूषित

माझगाव आणि बांद्रा-कुर्ला सर्वाधिक प्रदूषित

ग्रीनपीस इंडियाचा अहवाल, मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली, प्रदूषणाबाबत व्यक्त केली चिंता

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइड या वायूचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे मुंबईची हवा जास्त प्रदूषित झाली आहे, असा निष्कर्ष ग्रीनपीस या संस्थेने एका अहवालात व्यक्त केला आहे. उत्तर भारताच्या पलीकडे : भारतातील सात प्रमुख शहरांमध्ये ‘एनओटू’चे प्रदूषण आणि आरोग्यविषयक धोके या नावाचा हा अहवाल ‘ग्रीनपीस’ने नुकताच प्रसिद्ध केला. त्यात मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

नायट्रोजन डायऑक्साइड हा एक अदृश्य स्वरुपाचा विषारी वायू आहे. वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे, इंधनाच्या ज्वलनामुळे तो उत्पन्न होतो. शहरी भागांत त्याचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ वाहने आणि खनिज इंधनातून निर्माण होणारी ऊर्जा हे ‘एनओटू’चे मोठे स्रोत आहेत.हवेत ‘एनओटू’ची पातळी कितपत असायला हवी, याची मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांमध्ये घालून दिलेली आहे. ती मुंबई शहरातील २४ पैकी २२ ‘कंटिन्युअस अ‍ॅम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स’मध्ये ‘एनओटू’च्या वार्षिक सरासरी आकडेवारीने २०२३ मध्ये ओलांडली.

माझगाव येथे ‘एनओटू’ची सर्वाधिक पातळी नोंदवली गेली. त्याखालोखालची पातळी बांद्रा-कुर्ला येथील बस डेपोजवळील रस्त्यालगतच्या स्टेशनमध्ये नोंदवली गेली. ‘एनओटू’च्या दैनंदिन सरासरीनेही मार्गदर्शक तत्त्वांनी घालून दिलेली मर्यादा ओलांडली आहे. त्यामध्ये माझगाव आणि सायन येथे वर्षभराच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्तीची मर्यादा ओलांडली गेली. माझगावमध्ये मर्यादेपेक्षा जास्त नोंद वर्षातील २६७ दिवस झाली.

दरम्यान, वायूप्रदूषण हा भारतातील सार्वजनिक आरोग्याला असणारा सर्वात मोठा धोका आहे. वायूप्रदूषण कमी करण्यासाठी धाडसी, नाविन्यपूर्ण उपाय आवश्यक आहेत. असाच एक उपाय म्हणजे सार्वजनिक वाहतुकीची परवडणारी, स्वच्छ हवेची व्यवस्था. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक सुलभ व परवडणारी झाल्यास आपल्या मोटारी वा दुचाकी बाजूला ठेवण्यास आणि या सार्वजनिक व्यवस्थेचा लाभ घेण्यास नागरिकांना प्रोत्साहित करता येईल.

त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होऊन हवेत होणारे हानिकारक उत्सर्जनही कमी होईल. या साध्या उपायाने हवेची गुणवत्ता व सार्वजनिक आरोग्य यांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि शहरे ही अधिक समावेशक, आरोग्यदायी होऊ शकतात, असे ‘ग्रीनपीस’चे ‘मोबिलिटी कॅम्पेनर’ आकीझ फारूख यांनी म्हटले आहे.

नायट्रोजन डायऑक्साईडमुळे अस्थमा, श्वसनाचा त्रास
‘नायट्रोजन डायऑक्साईड’चे प्रमाण हवेत जास्त झाल्यास अस्थमा, श्वासनलिकेला सूज येणे, श्वास घेताना त्रास होणे आणि एकूणच श्वासोच्छवासाची प्रक्रिया बिघडणे असे आजार होतात. याचे भक्कम पुरावे आहेत. या वायूमुळे फुफ्फुसांचे कार्य बिघडते, तीव्र स्वरुपात अ‍ॅलर्जी येते, रक्ताभिसरणावर परिणाम होऊन हृदयविकार, अगदी फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो आणि श्वसनकार्य थांबल्याने कदाचित मृत्यूही येऊ शकतो.

शहरांमध्ये प्रदूषणाची चिंता
वायू प्रदूषण हे केवळ दिल्ली किंवा उत्तर भारतापुरते मर्यादित राहिलेले नाही. भारतातील सर्व शहरांमध्ये ‘एनओटू’च्या पातळीत मोठी वाढ झाली आणि त्याकरिता वाहतूक क्षेत्र सर्वात जास्त जबाबदार आहे. जसजशी शहरे वाढतात, तसतशी खासगी वाहनांची संख्या वाढते आणि हवेची गुणवत्ता बिघडते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR