धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार
पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर खुद्द शरद पवार यांनीच येत्या दोन दिवसांत धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. परंतु पक्षप्रवेश करताना त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही, असेही पवार म्हणाले. परंतु ते माढ्यातून इच्छुक असल्याने आता या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटीलविरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा निवडणूक लढवणार का, याबाबत पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, ते पक्षात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी वेट अँड वॉच अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मोहिते पाटील पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे माढ्यातील चित्र स्पष्ट झाले आहे.
१४ एप्रिलला प्रवेशाची शक्यता
१४ एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे तर १६ एप्रिलला ते सोलापुरात शरद पवारांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते. प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
फलटणच्या नाईक
निंबाळकरांची साथ?
सातारा व माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची यापूर्वीच घोषणा केली आहे. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यांना फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर तसेच संजीवराजे नाईक निंबाळकरांची साथ लाभणार असल्याची चर्चा आहे.