पंढरपूर: पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्याच्या घटनेवेळी महादेव दादा वाघमारे हजर नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मानसिक व शारीरिक धक्क्याने महादेव वाघमारे यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या फिर्यादी व पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात प्रेत ठेवून आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कुत्रा भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून शीतल मारुती जाधव यांनी दोन्ही हातामध्ये दगडे घेऊन अश्लील शिवागाळ करून विष्णू वाघमारे यांच्या घरामध्ये येऊन घरातील वस्तूंची तोडफोड केली. यानंतर विष्णू वाघमारे व रंजना वाघमारे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता,गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
संबंधित पोलिस अधिका-यांनी टाळाटाळ केली. राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट ३०७ सारखा गंभीर गुन्हा विष्णू वाघमारे यांच्यासह इतर ५ जणांवर दाखल केला. परंतु महादेव वाघमारे हे घटनेवेळी हजर नव्हते. त्यांचा भांडणाशी काही संबंध नव्हता. तरीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली, त्यांना पोलिस कोठडीमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक धक्का बसल्यामुळे त्रास सुरू झाला.
त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस खोटी तक्रार देणारे लोक व पोलिस कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात महादेव वाघमारे यांचे प्रेत ठेवून आंदोलन केले.