रायगड : प्रतिनिधी
खोट्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला माथेरानला नेऊन मित्रानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इतर दोन मित्रांनी अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रण केले. त्यानंतर त्यांनी हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपीसह त्याचा मित्र फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा मित्र आणि त्याचे दोन मित्र तिला खोट्या बहाण्याने माथेरानला घेऊन गेले. चौघेही एकाच परिसरात राहत असून आधीपासून एकमेकांना ओळखतात. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवस बाहेर जात असल्याचे मुलीने घरी सांगितले.
माथेरानला एका हॉटेलमध्ये नेऊन मुलीच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर अल्पवयीन मित्रासह दुस-या मित्राने कथितरीत्या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण केले. यानंतर आरोपींनी १४ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर हा व्हीडीओ व्हायरल केला.
मुलीच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हीडीओ पाहिल्यानंतर घरच्यांना याबाबत माहिती दिली. पालकांनी या घटनेबाबत मुलीला विचारणा केली असता तिने माथेरानमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला. घडल्या प्रकारानंतर घाबरून आपण ही बाब लपवून ठेवल्याचे मुलीने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेत मुलीच्या तीन मित्रांविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तीनपैकी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्य आरोपीसह दुसरा मित्र अद्याप फरार आहे. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.