तांदूळजा : वार्ताह
लातूर तालुक्यातील तांदूळजा परिसरातील महिला मायक्रो फायनान्समध्ये अडकत आहेत. अधिक व्याज दराने फायनान्सवाले महिलांच्या गटाचे आर्थिक शोषण करीत आहेत. दहा महिलांच्या एका गटास कर्ज दिले जाते रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध असल्यामुळे परिसरामध्ये बेरोजगारीची समस्या उग्र झाली आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याची शेती बिनभरोशाची असल्यामुळे असमानी, सुलतानी संकटांचा सामना परिसरातील शेतकरी व मजुरांना करावा लागत आहे. वाढती महागाई व मिळणारे अल्प उत्पन्न, खर्च त्यातून मजूरी देणे शक्य नसल्याने हतबल झालेला शेतमजूर या मायक्रो फायनान्सच्या विळख्यात गुरफटत आहे.
यामध्ये परिसरातील महिलांही बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकत असल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. फायनान्स कंपनीवाले मात्र सकाळी आल्यानंतर जोपर्यंत कर्ज वसुलीची रक्कम मिळत नाही तोपर्यंत तगादा लावून बसून राहतात. टशत्त पठाणी वसुली करणा-यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न धुळीस मिळत असून या बाबीकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे कर्जदार वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. एकीकडे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना अमलात आणत असून ‘उमेद’ यासारख्या उपक्रमांमधून ग्रामीण महिला स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर होत आहेत दुसरीकडे गल्लोगल्ली मायक्रो फायनान्स कंपन्या आपली दुकानदारी थाटत ग्रामीण भागातील महिलांचे कर्ज देऊन अधिक व्याज दर आकारुन शोषण करीत आहेत. कौटुंबिक व व्यावसायिक प्रश्नावर मात करण्यासाठी महिला मायक्रो फायनान्स चा पर्याय निवडत आहेत. या मायक्रो फायनान्सच्या व्याजदरावर राष्ट्रीयीकृत बँकांनी निर्बंध लावावे तसेच शासनाने ग्रामीण भागात व्यवसाय वृद्धीसाठी या मायक्रो फायनान्स कंपन्यांना परवानगी दिली असली तरी याच कंपन्या शासनाच्या उद्देशालाच बगल देत ग्रामीण महिलांचे आर्थिक शोषण करीत आहेत.
सर्वसामान्य महिला या बँकांच्या जाचक अटी व शर्थी तसेच मिळणा-या अपूर्ण माहितीसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारुन वेळ कशाला घालवावा या मानसिकतेतून टाळाटाळ करीत असतात पण याचाच फायदा मायक्रो फायनान्स कंपन्यांनी घेण्यास सुरू केले असून आपले जाळे परिसरात विणले आहे. दहा दहा महिलांचा समूह करून त्यांना कर्ज देणे व दिलेल्या विशिष्ट तारखेत ते कर्ज जमा करण्याचा तगादा लावून धरले जात आहे. यामध्ये २५ टक्के दराच्या आसपास व्याज आकारणी मायक्रो फायनान्स कंपन्या करत असल्याचीही चर्चा कर्जधारकांतून होत आहे. या अशा प्रचंड व्याजदराच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अमाप अडचणी येत असल्यामुळे या समुह गटाच्या महिला हवालदिल झाल्या आहेत.