१२ व्या दिवशी भारताला मोठा धक्का
पॅरिस : टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलेल्या मीराबाई चानू यंदा चौथ्या स्थानी राहिली. मीराबाईला तिस-या प्रयत्नात वजन उचलण्यात अपयश आल्याने तिने १९९ गुणांसह आपली पॅरिस ऑलिम्पिकमधील मोहिम पूर्ण केली. याशिवाय भारतीय महिला टेबल टेनिस संघाला जर्मन संघाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच भारताचा अविनाश साबळे ३००० मी अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत ११ व्या स्थानी फेकला गेला. त्यामुळे त्याचेही पदक हुकले.
या स्पर्धेत मीराबाई चौथ्या स्थानावर फेकली गेल्याने भारताचे पदक हुकले. मीराबाईकडून यंदा पदकाची अपेक्षा होती. पण अगदी थोडक्यात मागे राहिल्याने ती अपयशी ठरली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदकासाठी बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी मीराबाई चानू मैदानात उतरली. रात्री ११ वाजता तिचा सामना सुरू झाला. मागच्या वेळी तिने पदकाला गवसणी घातल्यामुळे ती यावेळी गोल्ड मेडल मिळवून देईल, असे वाटत होते. परंतु वेटलिफ्टिंगची लढत टफ झाली. सुरुवातीपासून चानूने सावधपणे प्रयत्न केले. परंतु काही प्रयत्नांत अपयशी ठरली. परंतु ११४ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. त्यामुळे ती चौथ्या क्रमांकावर फेकली गेली.
३००० मी. अडथळा शर्यतीत अविनाश साबळे अपयशी ठरला. तो बीड जिल्ह्यातील आष्टीचा रहिवासी आहे. त्यामुळे त्याच्याकडून ब-याच अपेक्षा होत्या. परंतु त्याच्याकडूनही पदकाच्या आशा पूर्ण झाल्या नाहीत. त्याने सुरुवात चांगली केली. पण तो शर्यतीत नंतर मागे पडला. यासह अविनाश अंतिम फेरीत ८.१४.१८ या वेळेसह ११ व्या स्थानी राहिला. त्यामुळे भारताला १२ व्या दिवशी दोन पदके मिळवण्यात अपयश आले. आधीच विनेश फोगटचे स्वप्न भंगले होते. त्यात या दोन्ही प्रकारात अपयश आल्याने १२ व्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला.