31 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeलातूर‘मी कुमार’ : सामाजिक निती-मूल्यांचा संघर्ष नाट्य रसिकांना भावला

‘मी कुमार’ : सामाजिक निती-मूल्यांचा संघर्ष नाट्य रसिकांना भावला

लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आहे. दि. १२ डिसेंबर रोजी कलोपासक मंडळ लातूरच्या वतीने मराठी अनुवाद विजय तेंडूलकर यांचे व श्रुतिकांत ठाकुर दिग्दर्शित ‘मी कुमार’ या तीनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. नैसर्गीक मानवी परस्पर आसक्त प्रवृत्ती, सामाजिक नीती मुल्य यातील संघर्ष या नाटकात अधोरेखित होतात.
गुजराती नाटककार मधु राय लिखीत ‘कुमारनी आगाशी’ या सुप्रसिद्ध नाटकाचे मराठी नाटककार विजय तेंडूलकर यांनी मराठीत अनुवाद केलेले ‘मी कुमार’ हे नाटक.  हे नाटक एक उच्चभू्र समाजात घडणा-या घटनेवर आधारित मानवी नाते संबंधांवर प्रकाश टाकणारं. एका परदेशी जाणा-या व्यक्तीला मित्र परिवारातर्फे  पार्टी दिली जाते. त्या फेरवेल पार्टीत हे नाटक उलगडत जातं. अगदी हलक्या फुलक्या संवादांतून उलगडत जाणारं हे नाटक गंभीर विषयावर भाष्य करत जातं. महाविद्यालयीन विद्यार्थी कुमारच्या आत्महत्येला खून समजणारा त्याचा भाऊ हर्षद परदेशी जाऊ पाहणा-या बिपीनला कुमारच्या मिलाचाच त्याचा खुनी समजतो व विषय वरचेवर गंभीर होत जाते.
स्त्रीपुरुष संबंधांची तरलता व सामाजिमक  भीषण विदारकता या नाटकात दिसून येते. बिपीनलाच कुमारच्या आत्महत्येचं कारण माहित असतं.  नीशा कुमारची वहिनी. हिच्याशी कुमारचे प्रेम संबंध जुळतात. या संबंधातून गुंतागुंत वाढत जाते व आत्महत्या की खून यावर प्रकाश पडत जातो. वैयक्तीक स्त्री पुुरुष संवेदना, अहंकार सामाजिक नीती मुल्ये त्यांवर भाष्य करुन जाणारं हे नाटक. शेवटी कुमारच्या मृत्यूलासुद्धा मनोरंजनाच्या पातळीवर नेऊन ठेवतो. आत्महत्येसारख्या गंभीर घटनेलाही आपण विरंगुळ्याच्या गप्पा गोष्टीपेक्ष महत्वाचे समजत नाही. ही संवेदनहिनता या नाटकात अधोरेखित होते.
हर्षद (दस्तगीर शेख), निशा (श्रेया कुलकर्णी), अमर (महेश दास्ताने), कुमार (आशुतोष खरवळे), बिपीन (अश्विन देसाई), अभिलाशा (वृषाली इंगोले), सुधा (अनिता देशमुख), पोस्टमन (शिवहार अकुसकर) या सर्वांनीच आपापल्या भुमिका उत्तम प्रकारे साकारल्या. त्यातल्या त्यात लक्षा रहाते ती सुनिता देशमुख यांची ‘सुधा’ आणि दस्तगीर शेखचा ‘हर्षद’. दिग्दर्शक म्हणुन श्रुतिकांत ठाकुर यांनी खुप मेहनत घेतलेली दिसली. एक-एक प्रसंग कल्पकतेने त्यांनी उभा केला.  परंतु, नाटकातील एखाद दुसरे पात्र सोडले तर बाकी सगळ्या पात्रांनी चक्क दोन-दोन, तीन-तीन पेग दारु पिऊनही त्यांना दारु चढलेली दिसली नाही की, त्यांचे बेअरिंग गेले नाही. हे विशेष.  सुनिल निलंगेकर यांचे नेपथ्य अटोपशीर होते. श्रुतिकांत ठाकुर यांची प्रकाशयोजना उत्तम होती. कौस्तूभ जोशी यांचे संगीत संकलन अफलातून होते. भारत थोरात यांनी रंगभूषेची जबाबदारी ब-यापैकी सांभाळली, रागिणी कुलकर्णी व शैलजा शर्मा यांची वेशभूषा ब-यापैकी होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR