22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबई : प्रतिनिधी
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळे अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. मुंबईत लेप्टोच्या रुग्णसंखेत वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या जून महिन्यात लेप्टोस्पायरोसिसचे २८ रुग्ण आढळून आले होते तर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. लेप्टोस्पायरोसिस झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरवर्षी जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे या काळात मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोचे रुग्ण आढळतात. या रुग्णांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आले आहेत. मुंबईतील सखल भागात पाणी साचते. रस्त्यावरील हे पाणी बिळामध्ये शिरल्याने बिळातील घुशी, उंदीर बाहेर येतात. तेव्हा त्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात मिसळते आणि त्यामुळे शरीरावर जखम असल्यास आणि त्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात जास्त वेळ थांबू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिका-यांनी केले आहे.

लेप्टो स्पायरोसिस होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी

– पावसाच्या साचलेल्या पाण्यातून जाऊ नये
– सांडपाणी मिसळलेल्या पाण्यातून जाऊ नये
– पायाला जखम झाली असल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार करावा
– साचलेल्या पाण्यातून जाण्याची आवश्यकता असल्यास गुडघ्यापर्यंत गम बूट घालावे
– तापासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावेत

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे काय?
लेप्टोस्पायरा जंतूचा संसर्ग झाल्यापासून ती व्यक्ती आजारी पडेपर्यंतचा कालावधी दोन दिवसांपासून चार आठवड्यांपर्यंतचा असू शकतो. माणसांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची अनेक लक्षणे दिसून येतात. ताप येणे, थंडी वाजणे, पुरळ येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसून येतात. काहीवेळा पोटदुखी, उलट्या होणे, अतिसार अशा समस्यादेखील उद्भवतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR