मुंबई : प्रतिनिधी
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडत असल्याचे चित्र शहरातील रुग्णालये पाहिल्यानंतर लक्षात येते. मुंबईत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यातच, सप्टेंबर महिन्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत मलेरियाच्या १२६१ केसेसची नोंद तर डेंग्यूच्या १४५६ केसेसची नोंद करण्यात आली.
दरम्यान, पावसाचा जोर ओसरला तरी पावसाळी आजारांची संख्या काही कमी झालेली नाही. शहरात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. हे दोन्ही आजार डासांमुळे होतात. त्यामुळे, घर व परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आणि डासांचा प्रादुर्भाव कमी होईल, यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून ‘भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे.