मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता आयुक्त भूषण गगराणी यांना सादर करण्यात आला. कोणतीही करवाढ नसलेला आणि आतापर्यंतचा सर्वांत मोठा अर्थसंकल्प असून आकारमान १४.१९ टक्क्यांनी वाढले आहे.
२०२४-२५ मध्ये ६५ हजार १८० कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. २०२५-२६ मध्ये या अर्थसंकल्पाचे आकारमान ७४ हजार ४२७ कोटी ४१ लाख रुपये इतके आहे. विविध विकास कामांसाठी ४३ हजार १६५ कोटी २३ लाख रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
१२ हजार ८५८ कोटी मुदत ठेवींतून विकास कामे करण्यात येणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेला ४३ हजार ९५९ कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे अपेक्षित आहे. मुंबईत सुरू असलेल्या इमारतींच्या कामातून सुमारे ९७०० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता करातून ५२०० कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित आहे.
जकातीपोटी राज्य सरकारकडून मिळणारी भरपाई अनुदान १४ हजार ३९८ कोटी १६ लाख रुपये इतके आहे. कर्मचा-यांच्या पगाराचा खर्च १७,५४० कोटी ४७ लाखांवर गेला आहे. मुंबईत २ लाख ३२ हजार ४१२ कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. सध्याच्या कर आकारणी शुल्कामध्ये वाढ करण्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संकेत दिले आहेत.
अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी घेण्यात येणा-या अधिमूल्यामध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे महापालिकेला येणा-या आर्थिक वर्षात ३०० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तर आतापर्यंत ७० कोटी रुपये इतका अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या उद्योगधंद्यांना किमान २० टक्के मालमत्ता कर लावण्यात येणार असून यातून ३५० कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
शिक्षण विभागासाठी ३ हजार ९५५.६४ कोटींचा अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिकेने आपल्या शिक्षण विभागासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ३ हजार ९५५.६४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आशुतोष सैनी यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला. प्रशासकाच्या राजवाटीतील या दुस-या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत ११.५७ टक्क्यांनी म्हणजेच ४५७.८२ कोटींची वाढ केली आहे.
गतवर्षी शिक्षण विभागाचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार ४९७.८२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात थोडी सुधारणा करत विद्यार्थ्यांना अर्थिक सहाय्य देण्याबरोबरच ई लर्निंगला महत्त्व देत जुन्या योजनांना या अर्थसंकल्पात पुन्हा बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
२०२५-२६ चा अर्थसंकल्प ७४,४२७ कोटींचा आहे. हा मुंबई महापालिकेच्या इतिहासातील आतापर्यंत मोठी अर्थसंकल्पातील वाढ आहे.
महसुलामध्ये मुंबई महापालिकेत ७,४१० कोटींची वाढ झाली आहे.
व्याजाचा परतावा अर्धा टक्का जास्त मिळत आहे.
महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे मालमत्ता कर पण त्यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.
महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत.
प्रीमियम एफएसआयची विभागणी ४ संस्थांमध्ये केली जाते.
धारावी प्राधिकरण २५ टक्के, महापालिका २५ टक्के, एमएसआरडीसी २५ टक्के, राज्य सरकार २५ टक्के
आता धारावी प्राधिकरणाला २५ टक्के गरज नाही. कारण ते स्वतंत्र झाले आहेत. हा एफएसआय मुंबई महापालिकेकडे वर्ग होईल.
३०० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल.