28.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरमोकाट श्वानांचा वावर वाढला

मोकाट श्वानांचा वावर वाढला

लातूर : प्रतिनिधी
लातूर महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांची दहशतही दिवसेंदिवस वाढत चालली असून यामुळे शहरातील नागरीक, शाळकरी विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कचरा, हॉटेलमधील खाद्य पदार्थ रस्त्यालगत टाकला जातो. त्यामुळे या कच-यात खाद्य शोधण्यासाठी या मोकाट कुत्र्यांची भटकंती सुरु असते. या श्वानांचा त्रास रस्त्यावरुन जाणा-या – येणा-या पादचा-यांना व वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील श्वान पकडण्याची माहिम राबवावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
शहरातील विविध भागातील कचराकुंडया तसेच रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, शाळा, मोकळी जागा, सोसाईटी आवारात सर्वत्र या मोकाट श्वानांचा वावर वाढल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहर परिसरात मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. हे श्वान रात्री उशिरा येणा-या नागरिकांना लक्ष््य करीत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा शाळकरी विद्यार्थी या मोकाट श्वानांना पाहून घाबरुन पळतात. पळणा-या विद्यार्थ्यांचा श्वानांकडून पाठलाग केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरातील भाजीपाला मार्केट, चिकण मार्केट, दयानंद कॉलेज, औसा रोड, गांधी चौक, गंजगोलाई, छत्रपती शाहू महाराज चौेक, फु्रट मार्केट आदी भागात या श्वानांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी अनेक श्वान एकत्र येवून फिरतात. तसेच, पहाटे भाजीपाला घेण्यासाठी जाणा-या व विरुगुळा करण्यासाठी जाणा-या व दुचाकीवर जाणा-या चालकांच्याही श्वान पाठीमागे धावतात. त्यामुळे वाहनचालकांना देखील या श्वानांपासून सावध पवित्रा घ्यावा लागतो. श्वान पाठीमागे धावल्याने दुचाकीचालक घाबरुन दुचाकीवरुन पडतात. या घटनेने अनेक दुचाकीचालकांना गंभीर दुखापत झाली आहे.  शहरात चिकन विक्रीची मोठया प्रमाणात दुकाने आहे. येथे कोंबडयांचा कचरा येथील व्यवसायिक मोकळया ठिकाणी टाकतात. त्यामुळे मोठया प्रमाणात श्वानांचा वावर आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा शहरात श्वान पकडण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR