28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरमोघा, कोपरा येथील जलसंधारण कामाची केली पाहणी

मोघा, कोपरा येथील जलसंधारण कामाची केली पाहणी

अहमदपूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जलसंधारणाच्या विविध कामांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून या कामांबाबत त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या.अहमदपूर तालुक्यातील मोघा, कोपरा या गावांतील कामांचा यामध्ये समावेश होता.
          जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, अहमदपूरचे तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी जे.बी.पटेल,मुख्याधिकारी अजय नरळे, जलसंधारण अधिकारी विशाल कराड, तलाठी संतोष खोमणे, तलाठी प्रियंका पवार, सुरेंद्र गिरी ,मंडळ कृषि अधिकारी शिरीष खंदाडे, कृषि पर्यवेक्षक संतोष पाटील, कृषि सहाय्यक विनोद सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते. अहमदपूर तालुक्यातील मोघा येथील नाल्यावर जलसंधारण महामंडळ निधीतून उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधा-याच्या कामाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. या कामामुळे ९० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार असून जवळपास २३ हेक्टर क्षेत्राला सिंंचनाची सुविधा निर्माण होईल. नुकतेच या बंधा-याचे काम पूर्ण झाले आहे.
यासोबतच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून मोघा येथील लघुपाटबंधारे तलावातील गाळ उपसा सुरु असून  येथील कामाचीही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी  केली.  या तलावातून आतापर्यंत ३९ हजार १०० घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून त्यामुळे ३९ लाख लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार आहे. या तलावातून उपसलेला गाळ आजूबाजूच्या पाच गावातील शेतक-यांनी आपल्या  शेतात नेवून टाकला असल्याने  तेथील जमीनही सुपीक बनण्यास  मदत होईल. कोपरा येथील लघुपाटबंधारे तलावातूनही गाळ  उपसा करण्यात येत असून आजूबाजूच्या तीन ते चार गावातील शेतकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.
जवळपास २६ हजार घनमीटर गाळ आतापर्यंत उपसण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक शेतकरी यांना या कामासाठी शासनाने मदत उपलब्ध करून दिली असून यामुळे गरीब शेतक-यांना आपल्या शेतामध्ये गाळ नेवून टाकणे शक्य झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्याशी संवाद साधताना शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR