25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमोदी तिस-यांदा बनणार पंतप्रधान

मोदी तिस-यांदा बनणार पंतप्रधान

बैठकीत मोदींच्या नावाला पसंती, केंद्रात एनडीए सरकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दोन टर्म पंतप्रधान राहिलेले देशाचे मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपवला. १७ वी लोकसभा विसर्जित झाली आणि नुकत्याच १८ व्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल लागले. आता एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या. देशातील सर्व मित्रापक्षांसह मोदींनी आज दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत चर्चेअंती एनडीएने नरेंद्र मोदी यांनाच चेहरा म्हणून निवडले आणि पंतप्रधान पदासाठीही मोदींच्या नावालाच एकमताने मंजुरी देण्यात आलीे. यावेळी भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे भाजप मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे.

एनडीएच्या मंजुरीनंतर लवकरच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिस-यांदा सरकार स्थापन होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ४०० पारचा नारा देत भाजपने हवा केली होती. पण मतदारांनी एनडीएचा आकडा ३०० च्या खाली आणून ठेवला. विरोधकांना गेल्या १० वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला निकाल मिळाला. मात्र, इंडिया आघाडी सत्तास्थापनेपासून शंभर पावले मागे आहे.

एनडीएच्या बैठकीत २६ पक्षांचे २१ नेते हजर झाले होते. ७ जूनला एनडीएच्या निवडून आलेल्या सर्वच खासदारांची बैठक दिल्लीत होणार आहे. यानंतर एनडीए राष्ट्रपतींकडे सत्तास्थापेनाचा दावा करेल, अशी माहिती मिळते. राजनाथ सिंह, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याकडे मित्रापक्षांसोबत बोलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

८ जूनला शपथविधी?
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे एनडीएने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या ८ जून रोजी नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. ७ जूनला एनडीएच्या खासदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानपदाचा राजीनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर राजीनामा मंजूर करून मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळण्यास सांगितले आहे.

नितीशकुमार,
चंद्राबाबू किंगमेकर
आता देशात आघाडीचे राज्य येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला महत्त्व आले आहे. त्यामुळे हे दोन नेतेच एनडीए सरकारमध्ये किंगमेकर ठरणार आहेत. त्यामुळे सरकारमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR