22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीय विशेष‘मोबाईल माझा गुरू’

‘मोबाईल माझा गुरू’

ज्येष्ठ बालसाहित्यकार नागेश शेवाळकर यांच्या ‘मोबाईल माझा गुरू’ या बालकथासंग्रहात एकूण अकरा बालकथा असून या बालकथांमधून संवेदनशील अशा मनोहारी बालविश्वाचा देखणा आविष्कार लेखकाने घडवला आहे. विशेष म्हणजे या कथांतून आज सर्वांनाच अगदी प्रिय होऊन बसलेल्या मोबाईलची सकारात्मक उपयुक्तता लेखकाने अगदी कल्पकतेने रंजक शैलीतून या कथांमधून मांडली आहे.

आई आणि आत्याचं भांडण होऊन त्यांच्यात अबोला धरला जातो तेव्हा तो अबोला मोबाईलच्या मदतीने मिटवून टाकून त्या दोघींमध्ये पूर्वीसारखा सुसंवाद घडवून आणणारी गोड नि चाणाक्ष मुलगी ‘समजूतदार आसावरी’ कथेत भेटते; तर या छोट्या आसावरीसारखीच बुध्दिमान असलेली जास्वंदी वृद्धाश्रमात असलेल्या केदारच्या आजोबांना घरी परत आणण्याची छानशी आयडिया केदारला देते आणि तिची ही आयडिया वास्तवात येऊन केदारला त्याचे आजोबा मिळतात,असा आशय असलेली ‘जास्वंदी’ ही कथा वाचकमन सुखावून जाते. आज प्रचंड माहितीचा खजिना असलेल्या मोबाईलला स्वत:चा गुरू समजून आजीच्या देवपूजेप्रमाणे मोबाईलची पूजा करणा-या छोट्याशा प्रेरणाची गमतीशीर गोष्ट ‘मोबाईल माझा गुरू’ कथेत रंगवली आहे; तर मोबाईलचे अक्षरश: व्यसन लागलेला छोटा रितेश अगदी जेवतानाही मोबाईल बघत असतो,तेव्हा त्याची ही खोड त्याचे आजोबा कशी मोडतात, हे मोठ्या कल्पकतेने ‘हट्टी रितेश’ कथेत दर्शवले आहे. उन्हाळी सुटीत पक्ष्यांना अन्न-पाणी देण्यासाठी अक्षयने राबवलेल्या अनोख्या प्रयोगाचे सुंदर चित्रण ‘अक्षय प्रकल्प’ कथेमध्ये आहे; तर घरी आलेल्या पाहुण्यांनी परत जाते वेळेस घरातील छोट्यांना कदापीही पैसे देऊ नयेत, असे मत मांडणारी छोटी चुणचुणीत मुलगी ‘आरोही’ कथेत भेटते.

शिक्षकदिनाच्या दिवशी स्वत:च्या पुरस्कारप्राप्त आजोबांनी केलेल्या कार्याची गोष्ट सांगून शाळेतून सर्वप्रथम क्रमांक मिळविणा-या स्मार्ट सिद्धीची प्रेरणादायी कहाणी ‘आजोबा दिन’ कथेत रंगवली आहे; तर घरी आलेल्या पाहुण्यांना कांदा टाकलेले आईस्क्रीम देणारा छोटा श्रीकर ‘कांदा आईस्क्रीम’ कथेत भेटतो. याशिवाय या संग्रहातील ‘जम्माडी जंमत’, ‘बंद करा ! बंद करा ! ’ आणि ‘अभीची आबी’ या कथाही रंजक आहेत. थोडक्यात लेखक नागेश शेवाळकर लिखित ‘मोबाईल माझा गुरू’ या बालकथा संग्रहातील कथा सहजसुंदर असे मनोहारी बालविश्व साध्या-सोप्या शब्दांत जिवंत करतात आणि त्या मुलांसहित प्रौढ वाचकांनाही पुन:प्रत्यय देतात. ओघवत्या प्रवाही शैलीतील या वाचनीय बालकथा मनोरंजनासोबतच छानशी नि उपयुक्त अशी शिकवणही बाल-कुमारांना देऊन जातात. त्यामुळे म्हणावेसे वाटते की, या कथा आजच्या तंत्रयुगातील बाल-कुमारांना नक्कीच पसंत पडतील,यात संदेह नाही.
बालकथा : मोबाईल माझा गुरू
लेखक : नागेश शेवाळकर
प्रकाशक : मासिक ऋग्वेद प्रकाशन, आजरा, जि. कोल्हापूर
पृष्ठे : ७२, मूल्य : १५ रु.

-उमेश मोहिते
मोबा.: ७६६६१ ८६९२८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR