सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार हे निश्चित झाल्यानंतर भाजपाला आता दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी भाजपबाबत थेट नाराजी व्यक्त केली आणि मोहिते पाटील यांना साथ देण्याची मानसिकता बनत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे जेष्ठ नेते आणि जवळपास ७० ते ७५ हजार मतांची ताकद असणारे उत्तम जानकर यांनी आज ‘मोहिते यांना मदतीची गरज असताना त्यांना साथ द्यायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता झाल्याचे सांगितले. एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या आपल्याशी चर्चा करीत असले तरी भाजपकडून आपली सातत्याने फसवणूक होत असल्याची भावना जानकरांनी व्यक्त केली.
माळशिरस तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीवर सत्ता असल्याचा दावा करणा-या जानकर यांनी सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र या ठिकाणी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून जानकर नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सागर बंगल्यावर एकदा जानकर आणि नंतर त्यांच्या ४५ पदाधिका-यांच्या सोबत फडणवीस यांनी बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
आमदारकी स्थानिकांना मिळावी
यावर बोलताना आता पुन्हा एकदा शेवटचे भेटण्यासाठी फडणवीस यांनी बोलावले असले तरी येत्या चार दिवसात 10 हजार प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन यात निर्णय घेणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. आमदारकी आणि खासदारकी स्थानिकांना मिळावी ही कार्यकर्त्यांची भूमिका असून यापुढील सर्व निवडणुका अपक्ष लढविण्याबाबत दबाव असल्याचे त्यांनी सांगितले.
या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची, अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मोहिते पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क साधत आपण आपले वर्षानुवर्षांचे वाद संपवू, अशी भूमिका घेत आहेत. अशीच भूमिका आपलेही कार्यकर्ते घेऊ लागल्याने माळशिरस मध्ये २०१९ नंतर पुन्हा एकदा दोन्ही गटाचे एकत्रीकरण दिसू शकेल, असे जानकर यांनी सांगितले.
दोन लाखांचे मताधिक्य देणार
जर मोहिते आणि जानकर एकत्र आले तर एकट्या माळशिरस तालुक्यातून दीड ते दोन लाखांचे मताधिक्य मिळेल, असा दावा केला आहे. आता येत्या चार दिवसांत कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय फडणवीस यांना कळवण्यात येईल, असेही उत्तमराव जानकर यांनी सांगितले. जानकर यांच्या भूमिकेमुळे माढा लोकसभेची गणिते मोठ्या प्रमाणात बदलू शकणार असून भाजप समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, यावर माळशिरस तालुक्याची दिशा ठरणार आहे.