लातूर : प्रतिनिधी
लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधुन दरवर्षी यात्रा महोत्सवचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी ८ ते २५ मार्च या दरम्यान ७१ वा महाशिवरात्र यात्रा महोत्सव पार पडणार आहे. हा महोत्सव नियोजनबध्द व देखण्या स्वरुपात पार पाडून यात्रा महोत्सवाचा लातूर पॅटर्न घडावा, अशी अपेक्षा व्यक्त्त करुन यात्रा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त, शहरातील भाविक व प्रतिष्ठीत नागरिकांनी योगदान द्यावे,असे आवाहन देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांनी केले.
यात्रा महोत्सवाच्या विविध समित्यांचे गठण करण्यासाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान विश्वस्त, प्रतिष्ठीत नागरिक व भाविक- भक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, बाबासाहेब कोरे, अशोक भोसले, मन्मथप्पा लोखंडे, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, चंद्रकांत परदेशी, विशाल झांबरे, उमाकांत पंचाक्षरी, सिध्देश्वर उकीरडे, सचिन अलमले, पांडूरंग संपत्ते, व्यंकटेश हलिंगे, दत्ता बादाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर येथे प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारी सिध्देश्वर यात्रा ही केवळ लातूर शहर,जिल्हा नव्हे तर इतर जिल्हयातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असल्याचे सांगत जेष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे यांनी कर्नाटक राज्यातील हजारो भाविक व नागरिक सिध्देश्वर यात्रेत हजेरी लावत असल्याचे सांगितले. या बैठकीत यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्वागत समिती, झेंडा मिरवणूक समिती, पशुसंवर्धन व कृषी प्रदर्शन समिती, कुस्ती समिती, भजन- कीर्तन समिती, संरक्षण समिती, स्वयंसेवक समिती, प्रसिध्दी समिती, महिला स्पर्धा समिती, भोजन समिती, धार्मिक उत्सव समिती यासह विविध समित्यांचे गठन करण्यात आले.
या बैठकीत विश्वस्तांसह भाविक व प्रतिष्ठीत नागरिकांनी यात्रा महोत्सवाच्या योग्य नियोजनासाठी विविध सुचना केल्या. या सर्व सुचनांचा स्वीकार करत याबाबत योग्य नियोजन करण्यात येईल, असा विश्वास प्रशासकांसह ज्येष्ठ विश्वस्तांनी उपस्थितांना दिला. या बैठकीला शहरातील भाविकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.