मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक निकालानंतर आता पराभवावर विचारमंथन सुरू झाले आहे. पराभूत उमेदवारांच्या पराभवावर चिंतन करताना महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये पाडापाडीच्या राजकारणावरून आरोप -प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे राजकारणच बदलले आहे. विरोधक असणारे एकत्र तर एकत्र असणारे विरोधक बनले. पक्षांतर्गत कलह, जातीपातीचे राजकारण, मराठा आरक्षण, शेतक-यांचे प्रश्न अशा अनेक कारणांनी राज्याच्या राजकारणाने नवीन दिशा घेतली. आपली व्होट बँक सुरक्षित रहावी यासाठी पाडापाडीचे राजकारण झाल्याचा आरोप करत युती-आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.
दरम्यान, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला व राज्यात महायुतीला जबर झटका बसला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना जालना मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पराभवास मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर, मंत्री संदिपान भुमरे यांनीही सहकार्य केले नसल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील, अशी चर्चाही दानवे यांच्या पराभवानंतर होऊ लागली आहे.
नाशिक येथून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. भुजबळ हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र मराठा आरक्षण आणि शिवसेनेचा उमेदवारीसाठी आग्रह यामुळे भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर त्यांनी प्रचारातूनही माघार घेतल्याचा फटका गोडसे यांना बसल्याचे सांगण्यात येत आहे.
बारामती येथून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचे खापर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेवर फोडले आहे. या मतदारसंघात भाजप, सेनेचे आमदार असतानाही पवार यांचा पराभव झाला आहे. घटक पक्षांनी मदत न केल्यानेच पराभव झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे. काँग्रेसची आमदारकी सोडून शिवसेनेतून खासदारकी लढणा-या राजू पारवे यांना रामटेक लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपने विरोध केल्याने शिवसेनेने खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली. मात्र तरीही याचा उपयोग झाला नाही. पारवे यांच्या पराभवाचे खापर कृपाल तुमाने यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यावर फोडले आहे.
नगर दक्षिणमध्ये भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांनी केला. या दोन्ही ठिकाणी पक्षांतर्गत विरोध, शह-काटशहाचे राजकारण आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा रागही यातून दिसून आला.
घटक पक्षांवर संशयाचे धुके
बीड लोकसभा मतदारसंघातही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यांच्या मतदारसंघातही महायुतीची मोठी ताकद असताना, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या मतदारसंघातही घटक पक्षातील सहका-यांवर संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
खैरेंचा पराभव दानवेंमुळे?
छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीतही रस्सीखेच होती. आघाडीने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली. मात्र सेनेतून या जागेवर माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. सेनेने खैरे यांना तिकिट दिल्याने दानवे नाराज होते. ते पक्ष सोडणार, अशीही चर्चा होती. मात्र ते सेनेतच राहिले. तिकिटाचा घोळ मिटला तरीही खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासाठी खैरे यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले आहे.