नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन आणि इराण-लेबनॉन, इस्त्राईल- पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले दोन युद्ध पाहून भारतीय वैज्ञानिकांनी एका घातक अस्त्राची निर्मिती केली आहे. भविष्यात युद्धाचा परिणाम बदलण्याची या शस्त्राची ताकद आहे. भारतीय वैज्ञानिकांनी कमी काळात हे अस्त्र बनवले आहे. इस्रोची सुद्धा या शस्त्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे.
जगाच्या पाठिवर सुरु असलेले हे युद्ध पाहून भारताने सुद्धा एक घातक अस्त्र तयार केले. त्याचे नाव आहे ‘कामिकाजे ड्रोन’. भारताची एलिट संशोधन संस्था नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने ‘कामिकाजे ड्रोन’ विकसित केलंय.
स्वदेशी बनावटीचे इंजिन या ड्रोनमध्ये असून १,००० किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. ‘एनएएल’चे संचालक अभय पाशिलकर यांच्या नेतृत्वाखाली या घातक ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे. हे कमी खर्चिक, मानवरहीत परिणामकारक हवाई वाहन आहे. एका ठराविक उंचीवरुन हे कामिकाजे ड्रोन उड्डाण करते. स्फोटक वाहून नेणारे हे ड्रोन टार्गेट जवळ काही वेळ भ्रमण करु शकते. टार्गेटला धडकल्यानंतर मोठा विस्फोट होतो. कमांड सेंटरमधून हे ड्रोन कंट्रोल करता येते.
३० एचपी वँकेल इंजिनमुळे हे ड्रोन १०० ते १२० किलो वजन वाहून नेऊ शकते. यामध्ये ३० ते ४० किलोंची स्फोटक आहेत. ‘एनएएल’ ही संस्था ‘सीएसआयआर’ची घटक आहे. १९५९ साली ‘सीएसआयआर’ची स्थापना झाली. दुस-या महायुद्धापासून कामिकाझे ड्रोनची संकल्पना अस्तित्वात आली. जपानी वैमानिक शत्रूच्या टार्गेटवर थेट आपलं विमान धडकवायचे. यात मानवी जीवाचे सुद्धा नुकसान व्हायचे.
आता कामिकाजे ड्रोनमुळे शत्रुची वित्तहानी, जिवीतहानी होईल पण आपले मानवी नुकसान होणार नाही. कारण हे मानवरहीत ड्रोन्स आहेत. कामिकाजे ड्रोनचे वैशिष्टय म्हणजे ‘जीपीएस’ चालत नाहीत, अशा ठिकाणी सुद्धा ही ड्रोन्स काम करतात. इस्रोने विकसित केलेली ‘एनएव्हीआयसी’ सिस्टिम या ड्रोन्समध्ये आहे. त्यामुळे ‘जीपीएस’ सिग्नल जॅम असलेल्या भागात सुद्धा हे ड्रोन्स आपले काम अचूकतेने करतात.